होमपेज › Konkan › रत्नागिरीत एसटी वर्कशॉपमध्ये आग लागून लाखोंचे नुकसान

रत्नागिरीत एसटी वर्कशॉपमध्ये आग लागून लाखोंचे नुकसान

Published On: Feb 02 2018 10:47PM | Last Updated: Feb 02 2018 9:33PMरत्नागिरी : प्रतिनिधी

नजीकच्या टीआरपी येथील एसटीच्या वर्कशॉपमधील भंगाराच्या सामानाला शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून त्यामध्ये लाखो रुपयांचे भंगार जळून खाक झाले. वर्कशॉप नजीकच्या गवताला लागलेली आग भंगारापर्यंत पोहोचली आणि आगीचा भडका उडाला. दरम्यान, लिलावाच्या दिवशीच भंगाराला आग लागल्याने या आगीतून संशयाचा धूर निर्माण झाला आहे. 

काही वर्षांपूर्वीही अशाच पद्धतीने भंगाराच्या सामानाला आग लागली होती. शुक्रवारी लागलेल्या आगीवर तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवण्यात यश आले. टीआरपी येथे एसटीचे वर्कशॉप आहे. या वर्कशॉपच्या शेजारी मोकळा भूखंड असून त्यामध्ये गवत वाढले होते. सुरूवातील गवताला आग लागल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले. या भूखंडाच्या पलिकडच्या बाजूला एसटी वर्कशॉपमधील भंगाराचे सामान ठेवण्यात आले होते. यामध्ये एसटीच्या सीट्स, गाड्यांचे टायर, प्लास्टिक, प्लायवूड, पत्रे आणि इतर सामान ठेवण्यात आले होते. या सामानापर्यंत आग पोहोचली आणि आगीचा अचानक भडका उडाला. भंगाराच्या सामानाला आग लागल्याचे लक्षात येताच कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. वार्‍यामुळे आगीने अवघ्या काही सेकंदांत रूद्रावतार धारण केल्याने आग विझवण्यासाठी ‘रनप’च्या अग्निशमन यंत्रणेला याची माहिती देण्यात आल्यावर तत्काळ बंब घटनास्थळी दाखल झाल. 
दरम्यान, अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल होईपर्यंत आगीने भीषण रूप धारण केले होते. भंगारामधील प्लास्टिक सीट्स, टायर आणि प्लायवूडने पेट घेतला होता. यामुळे आग नियंत्रणात आणताना मर्यादा येत होत्या. ज्या ठिकाणी आग लागली होती त्यापासून अवघ्या काही अंतरावर टायर रिमोल्डिंगसाठी वापरण्यात येणारी पावडर आणि ऑईल असल्याने मोठी हानी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. तसेच भंगाराच्या अलीकडच्या भागात भंगारामधील गाड्या उभ्या ठेवण्यात आल्या होत्या. या गाड्याही आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची भीती होती.  मात्र, वर्कशॉपमधील कर्मचार्‍यांनी जुनी वाहने आणि इतर महत्त्वाचे सामान सुरक्षित ठिकाणी हलवले. तसेच भंगाराला लागलेली आग विझवण्यासाठी रत्नागिरी न.प.च्या अग्निशमन कर्मचार्‍यांना मोठी भूमिका बजावली. 

आग लागलेल्या ठिकाणी सुमारे दहा लाखांचे भंगार या ठिकाणी गोळा करून ठेवण्यात आले होते. त्यांपैकी निम्म्यापेक्षा अधिक भंगार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे सांगण्यात आले.