होमपेज › Konkan › भूखंड घोटाळा अधिकार्‍यांना भोवणार!

भूखंड घोटाळा अधिकार्‍यांना भोवणार!

Published On: Nov 30 2017 11:31PM | Last Updated: Nov 30 2017 10:31PM

बुकमार्क करा





रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील तब्बल 163 उद्योजकांचे ‘एमआयडीसी’मध्ये मिळालेले भूखंड जाण्याची वेळ आली होती. काँग्रेसच्या आ. हुस्नबानू खलिफे यांनी विधान परिषदेच्या विनंती अर्ज समितीकडे उद्योजकांची कैफियत मांडली. त्यामुळे ‘एमआयडीसी’च्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी कोणाचेही भूखंड काढून घेतले जाणार नसल्याची ग्वाही दिली आहे. भूखंड घोटाळा करणार्‍या अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची सूचनाही समितीने केली असल्याचे आ.खलिफे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ‘एमआयडीसी’त 163 भूखंडांचे वाटप करण्यात आले. जून 2015 ते सप्टेंबर 2016 या कालावधीत दोन्ही जिल्ह्यांतील ‘एमआयडीसीं’मध्ये भूखंड वाटप करण्यात आले. त्यातील 98 भूखंड रत्नागिरीत तर 65 भूखंड सिंधुदुर्गातील आहेत. या भूखंड वाटपाची कार्यवाही चुकीच्या पद्धतीने झाली होती. ‘एमआयडीसी’चे सीईओ संजय शेट्टी यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर सर्व भूखंडधारकांना नोटीस पाठवून भूखंड ताब्यात का घेतले जाऊ नयेत?, अशी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली. 

 याप्रकरणी ‘एमआयडीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शेट्टी, उद्योग उपसचिव डॉ.ना.को.भोसले, प्रादेशिक अधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांची साक्ष घेण्यात आली. यावेळी चौकशी करून योग्य कार्यवाही केली जावी आणि चुकीच्या पद्धतीने भूखंडवाटप करणार्‍यांवर ‘एफआयआर’ दाखल करण्याच्या सूचना समितीने केल्या.

आ. खलिफे यांनी गोत्यात आलेल्या उद्योजकांना वेठीस धरण्यापेक्षा चुकीच्या पद्धतीने भूखंड वाटप करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार प्रथमदर्शनी ‘एमआयडीसी’ प्रशासनाची भूखंड वाटपात चुकीची कार्यपद्धती असल्याचे मान्य करण्यात आले असल्याचे आ.खलिफे यांनी सांगितले. त्याचवेळी  पुढील एका महिन्यात चौकशी पूर्ण केली जाईल.