Sun, Jun 16, 2019 02:35होमपेज › Konkan › कौंढर-झोंबडी साकव चोरीला गेलाच नाही

कौंढर-झोंबडी साकव चोरीला गेलाच नाही

Published On: Jun 01 2018 11:01PM | Last Updated: Jun 01 2018 10:40PMचिपळूण : खास प्रतिनिधी

वीस वर्षांपूर्वी बांधलेल्या कौंढर आणि झोंबडी या दोन गावांना जोडणारा लोखंडी पादचारी पूल दुरूस्तीच्या प्रतीक्षेत असून कंत्राटदाराने या पुलाचे लोखंडी साहित्य नेल्यानंतर सहा महिन्यांनंतर ग्रामस्थांना जाग आली. साकवाची चोरी झाल्याचा समज करुन त्यांनी पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा साकव  नव्याने बांधण्याचे कंत्राट सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत देण्यात आले असून या कामाविषयी दोन्ही गावांतील ग्रा.पं.ना जराही कल्पना नसावी, या बाबत आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

कौंढर-झोंबडी येथील जुन्या लोखंडी साकवाचे सामान कटरने तोडून अज्ञात व्यक्‍तीने नेल्याचे येथील ग्रामस्थांच्या सहा महिन्यांनंतर लक्षात आले. त्यानंतर या दोन्ही ग्रा.पं.नी एकत्रित विचार करून याची तक्रार गुहागर पोलिसांत देण्याचे ठरविले. सहा महिन्यांपूर्वी हे सामान तोडून नेणार्‍या व्यक्‍तीला काही ग्रामस्थांनी विचारले असता पुलाचे काम मंजूर झाले आहे, नवीन पूल होणार आहे म्हणून जुने सामान आम्ही नेत आहोत, अशी उत्तरे मिळाल्याचे काही ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. झोंबडी ग्रा.पं.ने गुहागर पोलिस  ठाण्यात पत्र देऊन या चोरीची खबर देण्याचा प्रयत्न केला. परंतु, या सामानाची किंमत किती त्याचे अंदाजपत्रक किती होते या प्रश्‍नांची उत्तरे देता न आल्याने पोलिसांनी हा अर्ज स्वीकारला नाही.

दरम्यान, कौंढर झोंबडी येथील जीर्ण झालेले दोन साकव सार्वजनिक  बांधकाम खात्याने साकव दुरूस्ती कार्यक्रमांतर्गत  नवीन बनविण्याचे ठरविले असून साईश्रद्धा मजूर सहकारी संस्था चिपळूण यांनी या दोन साकवांचे 10 लाख 48 हजार रुपये  किमतीचे काम घेतले आहे. कंत्राटदाराने फाऊंडेशनचे काम केले असून जुने  स्ट्रक्चर तोडून  नेले आहे. हे काम अद्याप पूर्ण झाले नसून या कामाची माहिती कौंढर झोंबडी येथील ग्रामपंचायतींना नसावी, या बाबत आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. मात्र, हा साकव लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.