Sun, Jul 21, 2019 01:23होमपेज › Konkan › ‘ओखी’च्या लाटांमध्येच जवानांचे नौकानयन 

‘ओखी’च्या लाटांमध्येच जवानांचे नौकानयन 

Published On: Dec 14 2017 1:45AM | Last Updated: Dec 13 2017 10:53PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

भारतीय लष्कराच्या 64 जवानांची 1 डिसेंबर रोजी सुरु झालेली मुंबई -गोवा-मुंबई ही साहसी समुद्र सफर परतीच्या मार्गे रत्नागिरीतून 13 रोजी मुंबईसाठी रवाना झाली. ओखी वादळामुळे समुद्रात उठलेल्या लाटांच्या आक्रमणावर यशस्वी स्वार होत आता ही मोहीम अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

‘4 सी बर्ड’ प्रजातीच्या जहाजा मधून सुरू असलेल्या समुद्र सफरीमध्ये प्रत्येक जहाजावर 5 अधिकारी सवार आहेत. या मोहिमेच्या बाराव्या दिवशी म्हणजेच दि.12 डिसेंबर रोजी रत्नागिरी किनार्‍यावर येताच या जहाजांनी चार टप्प्यांत पार पाडावयाच्या या सफरीचा तृतीय टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला. दि. 13 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता भगवती बंदरातील जेटीवरून मुंबईकडे रवाना होऊन या जहाजांचा अंतिम म्हणजेच चतुर्थ चरणाचा प्रवास सुरू झाला. यातील प्रथम चरण मुंबई ते रत्नागिरी तर द्वितीय चरण रत्नागिरी ते गोवा, तृतीय चरण गोवा ते रत्नागिरी या प्रवासांचे होते. या आधीदेखील ही जहाजे प्रथम चरणांती दिनांक 3 डिसेंबर रोजी रत्नागिरी किनार्‍यावर आली होती. प्रत्येक चरणांनातर नवीन सैनिकांना पाचारण करून सर्वांना संधी दिली जात आहे.  यामध्ये दोन महिला अधिकार्‍यांचा तसेच राष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद विजेत्या सैनिकांचादेखील समावेश आहे. 

प्रवासातील प्रथम दिवस हा शांत समुद्रामुळे सफरीसाठी अनुकूल ठरला तर दुसर्‍या दिवसापासून नौकानयन ‘ओखी’ या सागरी वादळामुळे खवळलेल्या समुद्रामुळे आव्हानात्मक ठरले होते. सैनिकांना दिलेल्या प्रशिक्षणामुळे व त्यांच्या अनुभवामुळे ते वादळामुळे दोन मीटर फुगवटा आलेल्या व जहाजांना अस्थिर करणार्‍या व समुद्रातून मार्गक्रमण करीत पहिले व दुसरे चरण यशस्वीरीत्या पार करू शकले. परतीचा प्रवास हा शांत समुद्रामुळे नौकानयनासाठी अनुकूल ठरत आहे. मोहिमेचा चौथा टप्पा पूर्ण होणार आहे.  या सफरीचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल भुवन खरे यांच्याकडे आहे. रत्नागिरी येथे भारतीय तटरक्षक दलातर्फे त्यांच्या ‘आय सी-302’ या नौकेने समुद्रात समुद्र सफरीवरील या जहाजांचे मार्गदर्शन केले. तसेच या सफरीसाठी त्यांना रसद व आवश्यक ती मदत पुरविण्यात आली. नौदलाचे ‘आयएनएस तराशा’ हे जहाज या सफरीबरोवर सदैव तैनात ठेवले आहे.