Mon, Aug 19, 2019 05:21होमपेज › Konkan › आयएनएमध्ये जिल्ह्यातून प्रथम सबलेफ्टनंट होण्याचा शुभम खेडेकर याल मान

आयएनएमध्ये जिल्ह्यातून प्रथम सबलेफ्टनंट होण्याचा शुभम खेडेकर याल मान

Published On: May 18 2018 1:17AM | Last Updated: May 17 2018 9:25PMरत्नागिरी : शहर वार्ताहर

आयएनए अर्थात इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वप्रथम सबलेफ्टनंट होण्याचा मान शुभम देवदास खेडेकर याला मिळणार आहे. कठोर प्रशिक्षणातून त्याने हे यश मिळवले आहे. 26 मे रोजी केरळमधील एलमला येथील आयएनएमध्ये पदवी प्रदान सोहळा रंगणार आहे.

इयत्ता पाचवीमध्ये शुभमने सातारा येथील सैनिकी स्कूलसाठी परीक्षा दिली. शिक्षक भेलेकर, राठोड, कडवईकर व मुळ्ये व आई दीप्ती यांच्याकडून 5 दिवसांत त्याने मार्गदर्शन घेतले. लेखी, तोंडी परीक्षांसह वैद्यकीय चाचण्यांद्वारे सैनिकी शाळेत दाखल झाला. सैनिकी शिस्त त्याने अंगी बाणवली आणि बारावीपर्यंत तेथे शिक्षण घेतले. बारावीत त्याने यूपीएससी, एसएसबी या परीक्षांमध्ये यश मिळवले. आयएनएमध्ये प्रवेशासाठी सैनिकी स्कूलमध्येच तयारी करून घेण्यात आली. सुरवातीपासूनच कठीण प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा, वैद्यकीय चाचणी यातून शुभमला आयएनएमध्ये प्रवेश मिळाला. व्यक्तिगत यश मिळाले तरी एकाच्या चुकीमुळे संपूर्ण गटसुद्धा बाद होऊ शकतो, अशा खडतर काळातून शुभम सामोरा गेला. शुभमने सर्व क्रीडा स्पर्धांमध्ये अव्वल स्थान पटकावले. दहावीत 88 व बारावीमध्ये 78 टक्के गुण मिळवले. तो पुणे, बेंगरूर येथे पुढील परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी गेल्याने अनेक वर्षे मोठी सुटी उपभोगली नाही.

7 वर्षे सातारा सैनिकी शाळेत त्याला शिस्तबद्ध प्रशिक्षण मिळाले. कठोर परिश्रम व तिथल्या गुरुजनांमुळे आयएनएमधील प्रवेश सुकर झाला. तरीही प्रचंड मेहनत, स्पर्धा, संयम अशी स्थिती अनुभवली. एलिमला येथील इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमीमध्ये त्याने चार वर्षे नेव्हल, बी.टेकचे शिक्षण घेतले. आता त्याला पदवीप्रदान होणार असून शुभम सबलेफ्टनंट होणार आहे. 

प्रचंड मेहनत व इच्छाशक्तीच्या जोरावर शुभमने ही मजल मारली, असे शुभमची आई दीप्ती व वडील देवदास खेडेकर यांनी सांगितले. शुभमची आई के. प. अभ्यंकर मूकबधीर विद्यालयात व वडिल जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा बजावत आहेत. त्यांनी लहानपणापासूनच शुभमला त्याचे सैन्यात जाण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी नेहमीच पाठिंबा दिला. शुभमने लहानपणीच सैनिकी क्षेत्रात जायचे नक्की केले. सैनिकी शाळेत असताना त्याला पालक या नात्याने प्रोत्साहन, पाठिंबा व मनोधैर्य वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. पालकांनीही प्रोत्साहन दिल्यास पाल्यांना भरपूर संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.