Wed, May 22, 2019 10:14होमपेज › Konkan › तब्बल १० वर्षांनी ‘त्याला’ मिळाली रक्ताची नाती

तब्बल १० वर्षांनी ‘त्याला’ मिळाली रक्ताची नाती

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 14 2017 10:36PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : शहर वार्ताहर

दिनांक 4 ऑगस्ट 2013 रोजी पुणे येथील लोणीकंद जवळील फुलगाव  फाट्यावर रात्री 8 वाजता सुमारे 45 वर्षांचा तरुण दयनीय अवस्थेत रस्त्यावर बसल्याचे आव्हळवाडी पुणे येथील माहेर संस्थेला कळले. त्या संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी त्या  अर्थहीन बडबड करणार्‍या तरूणाला माहेर करूणालय या संस्थेत दाखल केले. तेथून जानेवारी 2016 ला रत्नागिरीतील माहेर संस्थेच्या स्वाधीन केले. रत्नागिरीत आल्यावर त्याच्यावर मनोरूग्णालयाच्या मदतीने उपचार करण्यात आले... तो ठणठणीत बरा झाला...आणि त्याने आपला पत्ताही सांगितला... मात्र  त्याला त्याचे घर मिळण्यास तब्बल 10 वर्षे लोटली...माहेरच्या पदाधिकार्‍यांनी तो पत्ता शोधला आणि अल्पावधीतच त्या पेशाने धान्य व्यावसायिक असलेल्या प्रौढाला त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात यश आले... ही कहाणी आहे तेलंगणाच्या श्रीशिलम साहेबराजे मेरगू याची.दिनांक 4 ऑगस्ट2013 रोजी  पुणे येथील लोणीकंद जवळील फुलगाव  फाट्यावर रात्री 8 वाजता 45 वर्षाचा तरुण दयनीय अवस्थेत रस्त्यावर बसला होता.  त्याची दाढी वाढली होती, अंगामध्ये मळलेली कपडे व अंगाचा खूप घाण वास येत  होता अशा अवस्थेत त्याला  माहेर संस्था, आव्हळवाडी पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते  विजय तवर यांनी माहेर  करुणालय या निराधार पुरुषांच्या विभागात दाखल केला होता. तो तेलगू भाषेत अर्थहीन बडबड करीत होता.त्याला त्याचे नाव विचारले असता त्यांने श्रीशिलम  असे सांगितले होते. 

श्रीशिलम या व्यक्तीला पुनर्वसनासाठी दिनांक 1 जानेवारी  2016 रोजी माहेर संस्थेच्या रत्नागिरी विभागात पाठविण्यात आले होते. श्रीशिलम हा मानसिक रुग्ण असल्याचे माहेर संस्था पदाधिकार्‍यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालय येथील औषधे सुरु केली. मानसिक स्थितीत थोडी सुधारणा झाल्याने श्रीशिलम संस्थेतील कामात मदत करायचा. परंतु, स्वभावाने शांत असल्याने व भाषा समजत नसल्यानेे तो अबोल असायचा. श्रीशिलमला विश्‍वासात घेऊन सुनील कांबळे व अमित चव्हाण यांनी त्याला त्याचे पूर्ण नाव-गाव तालुका व जिल्हा विचारायला हिंदी व इंग्रजी भाषेत सुरवात केली. त्याचे उच्चार तेलगू असल्याने समजण्यास खूप कालावधी लागला. त्याने आपले पूर्ण नाव श्रीशिलम साहेबराजे मेरगू, पत्ता : गुजीकुंटा, तहसील छेरीयाल,जिल्हा वरंगल असे सांगितल्यावर माहेर संस्थेचे सुनील कांबळे यांनी गुगल मॅप व इंटरनेटचा वापरुन सांगितलेल्या पत्त्याची खातरामा केली. हा पत्ता हा तेलंगणा येथील असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

इंटरनेटचा वापरून वरंगल  पोलिस ठाणे व तेथून छेरीयाल पोलिस ठाण्याचा फोन नंबर मिळवून गुजीकुंटा या गावातील सरपंचांशी संपर्क साधण्यात आला. व गुजीकुंटा या गावामध्ये श्रीशिलमचे पूर्ण कुटुंब राहत असल्याचे समजले. त्याची पत्नी विजया, मुलगी वरलक्ष्मी, मुलगा साईबाबू व अशोक असे सर्व असल्याचे समजले. लगेच श्रीशिलीम याचा मुलगा, मेहुणा व मित्र परिवार स्वत:च्या गाडीने दिनांक 12 डिसेंबर 2017 रोजी तेलंगणावरुन रत्नागिरीतील माहेर संस्थेत हजर झाले.  श्रीशिलमला घर व आपली माणसे मिळाल्याने माहेर संस्थेचे संचालिका ल्युसी कुरिया, अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, अधीक्षक सामाजिक कार्यकर्ता सुनील कांबळे, अमित चव्हाण, मीरा गायकवाड, सोनाली केळकर, जोसेफ दास यांनी व माहेर संस्थेचे सर्व कार्यकर्ते यांनी समाधान व्यक्त केलेे.