होमपेज › Konkan › कर्मचार्‍यांच्या संपाची धार कायम

कर्मचार्‍यांच्या संपाची धार कायम

Published On: Aug 08 2018 10:32PM | Last Updated: Aug 08 2018 10:32PMरत्नागिरी : प्रतिनिधी

सातव्या वेतन आयोगाची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांसह शिक्षकांनी मंगळवारपासून सुरू केलेल्या संपाच्या दुसर्‍या दिवशी आंदोलनाची धार  कायम ठेवली. बुधवारी कर्मचार्‍यांनी भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. संपाची तीव्रता कायम राखल्याने बुधवारी दुसर्‍या दिवशीही शासकीय कामकाजावर परिणाम झाला. 

सुमारे 11 हजार कर्मचार्‍यांच्या सहभागाने सुरू झालेल्या राज्यव्यापी  संपाने शासकीय कार्यालये ओस पडली. त्यामुळे महसूल विभाग, ग्रामपंचायत विभाग, समान्य प्रशासन आदी विभागांसह तलाठी कार्यलयातील जमिनीसंदर्भातील कामे, सातबारा संगणकीकरणाची प्रक्रिया आणि महसुलीद्वारे येणार्‍या उत्पादनावर परिणाम झाला. संपात जिल्हा परिषदेचे कर्मचारी, सरकारी रुग्णालयांच्या कर्मचार्‍यांचा सहभाग कायम राहिल्याने शासकीय रुग्णालायासह शाळांच्या कामावरही परिणाम झाला. संपात वर्ग दोन, तीन आणि4 चे सर्व कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा जिल्हा संघटनेने केला. बुधवारी कर्मचारी समन्वयक संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कर्मचार्‍यांनी निदर्शने केली. भर पावसात हे आंदोलन सुरू असतानाही यामध्ये कर्मचार्‍यांचा सहभाग लक्षणीय होता.
शाळांना सुट्टी, तर कार्यालये शांत शासकीय कर्मचार्‍यांच्या या तीन दिवसांच्या संपात शिक्षकांनीही सहभाग घेतल्याने बुधवारी जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा भरल्या नाहीत. तर कर्मचारी  न आल्याने शासकीय कार्यालयांमध्येही शांतता होती.  जिल्हाधिकारी कार्यालयात राजपत्रित अधिकारी वगळता बहुसंख्येने कर्मचारी नसल्याने कार्यालये सुनी होती. तर संपाचा दुसरा दिवस असल्याने सर्वसामान्यांनीही कामे लांबणीवर टाकल्याने सामान्याचे कार्यालय असलेल्या ‘सेतू’ कार्यालयातही शांतता होती.