Mon, Jun 17, 2019 04:24होमपेज › Konkan › ‘गडनदी’चा होणार पर्यटन विकास

‘गडनदी’चा होणार पर्यटन विकास

Published On: Apr 13 2018 10:36PM | Last Updated: Apr 13 2018 10:17PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यातील शेतकर्‍यांची जीवनवाहिनी असलेल्या गडनदी प्रकल्पाचा समावेश केंद्रीय जल आयोगाच्या  शिफारशीने प्रधानमंत्री सिंचन योजनेत करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकल्पाच्या विकासासाठी जलसंपदा विभागाने साडेसहाशे कोटी रुपये खर्च केला आहे. तर या प्रकल्पाच्या प्रलंबित कामांसाठी प्रधानमंत्री सिंचन योजनेतून 265 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तर या प्रकल्पाच्या पर्यटन विकासासाठी  75 लाखांचा निधी  विविध उपक्रमांसाठी देण्यात येणार आहे. 

संगमेश्‍वर तालुक्यातील गडनदी प्रकल्पाचा समावेश केंद्रीय जल आयोगाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. त्यानुसार पुढील वर्षी या प्रकल्पाची सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना गडनदी प्रकल्प बारमाही सिंचनासाठी हमखास पर्याय आहे. पूर्वेपासून पश्‍चिम दिशेच्या असंख्य गावांची तहान भागवणार्‍या 
महत्त्वाकांक्षी गडनदी धरण प्रकल्पासाठी जलसंपदाचे आतापर्यंत 651 कोटी रुपये खर्च झाले आहेत. तर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अडीचशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार आवश्यक निधी प्राप्त होत असल्याने प्रकल्प पूर्ण होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

गडनदी जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी मध्यम धरण प्रकल्प असल्याने प्रकल्प लाभक्षेत्रातील पुनर्वसन, धरण बांधकाम, अपूर्ण कालवे आदी कामांचा समावेश करत एकूण 265.52 कोटी रुपयांचा निधी उपल्ब्ध झाला आहे. हा निधी दोन वर्षांत दोन टप्प्यांत खर्च करून 2019 ला प्रकल्पासह पुनर्वसन, कालवे आदी सर्व कामे केंद्र व राज्य सरकार यांच्या सहयोगातून जलसंपदा विभागातर्फे पूर्ण करण्यात येणार आहेत. या प्रकल्पात जलाशय, नौकानयन, वॉटरपार्क आणि परिसरात उद्यानांच्या माध्यमातून पर्यटकीय विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी 75 लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.