Thu, Apr 25, 2019 11:30होमपेज › Konkan › संगमेश्‍वरात पूर; जिल्ह्यात मुसळधार

संगमेश्‍वरात पूर; जिल्ह्यात मुसळधार

Published On: Jul 13 2018 10:48PM | Last Updated: Jul 13 2018 10:48PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्याला गेले दोन मुसळधार पावसाने झोडपून काढले. शुक्रवारी  संगमेश्‍वरमध्ये शास्त्री, सोनवी, बावनदी, गडनदी, सप्तलिंगी, असावी काजळी नद्यांनी पातळी ओलांडल्याने पूर आला, तर उर्वरित दक्षिण रत्नागिरीमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. गुरुवारी राजापूरमध्ये आलेला पूर शुक्रवारी ओसरला; मात्र मुसळधार पाऊस पडतच असल्याने पुन्हा पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. शुक्रवारीही रत्नागिरीसह राजापूर, लांजा, खेडमध्ये पावसाने अनेक भागांत पूरसदृश स्थिती निर्माण केली. अनेक भागांत  भात शेतीसह बाजारपेठेत पाणी शिरले. आगामी दोन दिवस मुसळधार पावसाचेच राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. 
शुक्रवारी सकाळी साडेआठ वजाता नोंदविलेल्या पर्जन्यमानानुसार संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात  सरासरी 86.56 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक पाऊस लांजा तालुक्यात नोंदवला. लांजा तालुक्यात दिवसभरात 187 मि. मी असा विक्रमी पाऊस झाला. तर संगमेश्‍वरात 141 मि. मी. पाऊस झाला. मुसळधार पावसाने या दोन्ही तालुक्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण केली. बावनदीचे पात्र तुंबल्याने नदीच्या परिसरातील अनेक भागातील भात शेती पाण्याखाली गेली. आरवलीतही पुराचा वेढा पडला.  खेड तालुक्यात 85 मि. मी, पावसाची नोंद झाली. गेल्या आठवड्यातही जोरदार पावसाने खेडच्या जगबुडी नदीला पूर आला होता. जोरदार पावसाने येथे पुन्हा एकदा पूरसदृश्य स्थितीने बाजारपेठेत पाणी घुसले. मंडणगड 68, दापोली 31, गुहागर 30 चिपळूण85, रत्नागिरी  77  तर राजापूर तालुक्यात 75 मि. मी. पावसाची नोंद झाली. राजापूर तालुक्यात जोरदार पावसाने शहरी भागासह ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत केले. गुरूवारी असलेली पूरस्थिती शुक्रवारपर्यंत ओसरली तरी पाऊस कायम होता.
अमावास्येच्या भरतीमुळे दुपारीच संगमेश्‍वर खाडीभागात फुगवठा निर्माण होऊन त्याचा फटका फुणगुससह संगमेश्‍वर बाजारपेठेला बसला. शास्त्रीनदीचे पाणी रामपेठ आणि आठवडा बाजारात घुसले आहे तर सोनवीही पात्र सोडण्याच्या तयारीत आहे. संगमेश्‍वरातील व्यापारी सतर्क झाले असून आठवडा बाजारातील काही घरांसह दुकानांमध्ये पाणी घुसून नुकसान झाले आहे. माखजन बाजारपेठेवर सलग चौथ्यांदा पुराचे सावट असून फुणगुसमध्येही पुरसदृष्य स्थिती आहे. बावनदीने सकाळीच पात्र सोडले असून तळेकांटे, वांद्री, सोनगिरी, कोळंबे, कुरधुंडा, गावमळा, निढळेवाडी, ओझरखोल आदी भागातील नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे. सोनवीचे पाणी पात्राबाहेर पडून काही काळ मयुरबाग - शिवने मार्ग बंद झाला होता तर सोनवीचे पाणी बुरंबी गेल्येवाडीजवळ देवरूख - संगमेश्‍वर रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

जिल्हा नियंत्रण कक्षाच्या प्राथमिक अहवालानुसार दापोली तालुक्यात घरावर झाड पडल्याने घराचे अंशतः नुकसान झाले. खेडमध्ये पुराचे पाणी दुकानात शिरल्याने दुकानातील मालाचे सुमारे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. गुहागर तालुक्यात कोथळूक येथे एका घराच्या पडझडीत तीन हाजारची हानी झाली. संगमेश्‍वर तालुक्यात वादळी वार्‍याने घऱांचे पत्रे उडाले. दोन दिवस जोरदार पावसाने राजापूर तालुक्यातील अणुुस्करा घाट वाहतुकीसाठी बाधीत झाला. शुक्रवारीही जोरदार पाऊस झाल्याने हा घाट रस्ता मोकळा करण्यात अडचणी होत्या. मात्र दुपारी काही भाग मोकळा करुन यथील वाहतूक संथगतीने सुरू करण्यात आली. गेले दोन दिवस राजापुरात मुसळधार पावसाने अर्जुना  आणि कोदवली नदीच्या जलस्तरात धोका पातळीपर्यंत वाढ केली. त्यामुळे नदीकाठच्या दोन्ही बाजुला पुराचे पाणी पाण्याने चिखलगाव, गोठणे दोनिवडे, शिळ आदी गावातील संपर्क तुटण्याची शक्यता होती. जोरदार पावसाने जवाहर चौक परिसरासह बाजारपेठेत पूरस्थिती निर्माण झाली होती मात्र शुक्रवारी पूर ओसरला होता. मात्र पाऊस पडत असल्याने धोका कायम आहे.