होमपेज › Konkan › मत्स्य विभाग जि.प.कडे वर्ग करण्याचा प्रयोग

मत्स्य विभाग जि.प.कडे वर्ग करण्याचा प्रयोग

Published On: Apr 26 2018 11:04PM | Last Updated: Apr 26 2018 10:51PMरत्नागिरी : प्रतिनिधी

कोकणचे अर्थकारण अवलंबून असलेल्या  मत्स्य व्यवसायाला संजीवनी देण्यासाठी आणि या व्यवसायात आलेली अराजकता समूळ नष्ट करण्यासाठी आता मत्स्य विभाग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंमलाखाली आणण्यात येणार आहे.  हा विभाग जि.प.च्या पशुसंवर्धन खात्याकडे वर्ग करण्यात येणार असून हा प्रयोग कोकणातील चार जिल्ह्यांत करण्याच्या सूचना  प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. 

मत्स्य व्यवसाय हा मत्स्यशेती म्हणून  कृषी विभागाशी अप्रत्यक्षरीत्या संलग्न आहे. मात्र, मत्स्य विभागाचा कारभार आणि नियंत्रण कृषी विद्यापीठाकडे देण्यात आले आहे. गतवर्षी मत्स्य विभागाला देण्यात आलेला कोट्यवधीचा निधी खर्च न झाल्याने परत गेला. शासनाने राबविलेल्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत न पोचल्याने हा निधी खर्ची पडला नाही. त्यामुळे ही नामुष्की सातत्याने ओढवत असते.  मात्र, यामध्ये फारसा लाभ तळागाळात असलेल्या आणि पारंपरिक मत्स्य व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांना होत नाही. थेट लोकांशी निगडीत असलेल्या या व्यवसायाचा कारभार कृषी विद्यापीठाकडे असल्याने त्याचा फायदा होत नसल्याचे निदशर्र्नास आले आहे. कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या विभागाच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी आता हा विभाग जि. प. ला जोडण्यात येणार आहे. आता हा विभाग जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे आणि पर्यायाने  पशुसंवर्धन विभागाशी जोडण्याचा प्रयोग कोकणात करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे.  

कोकणातील पाचही जिल्ह्यांत या व्यवसायावर अवलंबून असल्याने हा प्रस्ताव शासनाने ठेवला असून त्याचा प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येणार आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या प्रशासनांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामळेे मत्स्य विभाग स्थानिक स्वराज्य  संस्थांच्या कक्षेत येणार आहे.