Fri, Jul 19, 2019 19:59होमपेज › Konkan › मच्छीमारांचा ‘नारळी पुनवे’चा मुहूर्त

मच्छीमारांचा ‘नारळी पुनवे’चा मुहूर्त

Published On: Aug 22 2018 12:57AM | Last Updated: Aug 21 2018 10:32PMरत्नागिरी : प्रतिनिधी

मासेमारीला 1 ऑगस्टपासून शासन मान्यता असली तरी बदललेले वातावरण, खवळलेला समुद्र यामुळे गेल्या आठ दिवसांपासून मासेमारी ठप्प झाली आहे. मासेमारीच्या पहिल्या हंगामातच मच्छीमारांना वातावरणाने दगा दिला असला तरी नारळी पुनवेेचा मुहूर्त साधण्याची तयारी मच्छीमार करू लागले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून मिरकरवाडा बंदरात चारशेपेक्षा अधिक बोटी पाऊस जाण्याची व खवळलेला समुद्र शांत होण्याची वाट पाहत आहेत.

राज्यातील किनारपट्टीवरील मासेमारीवरील बंदी 1 ऑगस्टपासून उठविण्यात आली. सुरुवातीचे आठ दिवस कोळंबी, बांगडा, पापलेट आदी मासे बर्‍यापैकी मिळाले. या मासळीला दरही चांगला मिळाला. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. दक्षिण भारतात विशेषत: केरळामध्ये वादळी वार्‍यासह पाऊस कोसळला, या हवामानाचा फटकाही मच्छीमारांना बसला आहे. गेल्या आठ दिवसांपासून मासेमारी बोटी मिरकरवाडा व भगवती बंदरात नांगर टाकून उभ्या आहेत. खवळलेला समुद्र शांत होण्याची व वातावरण नीरव होण्याची वाट मच्छीमार पाहत आहेत. वादळी वार्‍यामुळे पाण्यालाही करंट येत असल्याने जाळी एकत्र येऊन फाटत असतात. नारळी पुनवेनंतर जोरदार वार्‍याचा वेगही मंदावत असल्याने खवळलेला समुद्र शांत होतो. त्यामुळे नारळी पुनवेचा मुहुर्त साधण्यासाठी बंदरामध्ये जोरदार तयारी सुरु आहे. हवामानामुळे झालेल्या अघोषित बंदीचा फायदा घेऊन काही मच्छीमारांनी नौकांची शिंल्लक कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. मासेमारी बंद असल्यामुळे मिरकरवाडा जेटीवर मात्र शांतता पसरलेली दिसत होती. बोटींमध्ये बसून खलाशी जेवण बनविताना, जाळी व्यवस्थित ठेवताना, नौकांमध्ये पिण्याच्या पाण्याचा साठा करताना दिसत होते. हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या बोटींचे मालक जेटीवर उपस्थित राहून खलाशांना सूचना देताना दिसत होते.

मिरकरवाडा बंदरात छोट्यामोठ्या चारशेपेक्षा अधिक बोटी उभ्या आहेत. राजिवडा, काळबादेवी, रनपार, पूर्णगड, जयगड, हर्णै, साखरी नाटे या बंदरामध्येही उभ्या असलेल्या बोटी वादळी वारे व पाऊस जाण्याचा वाट पहात आहेत. जिल्ह्यात सर्वत्र सारखीच परिस्थिती आहे.