Sun, Jun 16, 2019 11:58
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › मत्स्य महाविद्यालय नागपूरला नेण्याचा घाट

मत्स्य महाविद्यालय नागपूरला नेण्याचा घाट

Published On: Apr 27 2018 10:26PM | Last Updated: Apr 27 2018 10:07PMरत्नागिरी : प्रतिनिधी

कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय नागपूर विद्यापीठाच्या अखत्यारित नेण्याचा घाट शासनाने घातला आहे. त्यामुळे सध्या शिरगाव महाविद्यालयाला जे मानांकन प्राप्त आहे, ते रद्द होणार आहे. पर्यायाने मानांकनप्राप्त पदवीसाठी विद्यार्थ्यांना परराज्यात जावे लागणार आहे. त्याशिवाय रत्नागिरी ते नागपूर कर्मचार्‍यांना ताण सहन करावा लागणार आहे.

रत्नागिरीतील शिरगाव मत्स्य महाविद्यालयाकडे भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांचे मानांकन  आहे. परंतु, हे महाविद्यालय नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत आल्यास हे मानांकन रद्द होईल. त्यामुळे राज्यातील सर्वच मत्स्य महाविद्यालयांची पदवी दुय्यम ठरेल. या बदलाचा मोठा दुष्परिणाम राज्यातील विद्यार्थ्यांवर होणार आहे. आपल्या राज्यामध्ये सक्षम असे शिरगाव मत्स्य महाविद्यालय असूनही राज्यातील विद्यार्थ्यांना मानांकन प्राप्त पदवी मिळवण्याकरिता परराज्यात जावे लागेल. तसेच राज्यातील विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात कारकीर्द करणे कठीण होणार आहे. देशपातळीवर मत्स्यशास्त्र क्षेत्रात राज्याची प्रतिमा खालावणार आहे. मत्स्यशास्त्र हा विषय प्रामुख्याने समुद्र या नैसर्गिक स्रोतावर आधारित आहे. यासाठी शिरगाव मत्स्य विद्यालय हे अतिशय सुयोग्य व परिपूर्ण आहे. परंतु, शासन मात्र या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करत आहे. 

कोकणामध्ये मत्स्य विज्ञान विद्यापीठ सुरू करा, अशी मागणी गेल्या काही वर्षांत सुरू आहे. परंतु, या मागणीला शासनाने  वाटाण्याच्या अक्षता लावल्या. शिरगावमधील मत्स्य महाविद्यालय नागपूर विद्यापीठाच्या अखत्यारित आणण्याचा घाट शासनाने केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोकणवासियांवर अन्याय  होणार असून रत्नागिरी - नागपूर असा प्रशासकीय ताणही कर्मचारी वर्गाला 
सहन करावा लागणार आहे. 

कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न मत्स्य महाविद्यालय 1981 पासून रत्नागिरी शहरानजीकच्या शिरगावमध्ये सुरु आहे. राज्यात केवळ तीनच मत्स्य महाविद्यालये आहेत. त्यांपैकी एक नागपूर, लातूर आणि तिसरे रत्नागिरी येथे आहे. कोकणाला अथांग  असा  720 कि.मी. लांबीचा हा समुद्रकिनारा आहे. एकूण 6 किनारपट्टीचे जिल्हे आहेत. 406 गावे तसेच  184 मासेमारी बंदरे आहेत. 4.50 लाख मच्छीमार लोकसंख्या असून यामध्ये 54 हजार 901 क्रियाशील मच्छीमार आहेत. कोकणात मुख्य तीन मोठी बंदरे आहेत. तर 22 धक्के मासे उतरविण्यासाठी आहेत.  13 हजार 53 यांत्रिकी नौका, 3 हजार  382 छोट्या होड्या व  7 हजार 73 पारंपरिक नौका आहेत. 175 बर्फ कारखाने आणि कोल्ड स्टोरेज आहेत.त्यावर पिढ्यान्पिढ्या चालणारी मासेमारी त्यामुळे कोकणात मत्स्यविज्ञान विद्यापीठ व्हावे, ही मागणी  2000 सालापासूनच जोर धरु लागली होती. या विद्यापीठासाठी स्थानिक आमदार, शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींनी वारंवार पाठपुरावा केला. परंतु, याकडे शासनाने कधीही लक्ष दिले नाही. शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय नागपूर येथे पशुविज्ञान, मत्स्यविज्ञान जोडण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. हे महाविद्यालय नागपूरला जोडले गेले तर पुन्हा एकदा कोकणवासियांवर अन्याय  होणार आहे.