होमपेज › Konkan › कुवारबांवमध्ये रस्ता विस्तारीकरण जमीन मोजणी पोलिस बंदोबस्तात

कुवारबांवमध्ये रस्ता विस्तारीकरण जमीन मोजणी पोलिस बंदोबस्तात

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 23 2018 1:18AMरत्नागिरी : प्रतिनिधी

तालुक्यातील मिर्‍या ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील मिर्‍या ते  हातखंबा या भागातील विस्तारीकरणासाठी गुरुवारी अतिरिक्त  सुरक्षा बलाच्या तुकड्यांसह पोलिस बंदोबस्तात मोजणी करण्यात आली. या मोजणीतील निकषामुळे येथील व्यापारीवर्गाची नाराजी असताना ही मोजणी झाल्याने या परिसराला गुरुवारी पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. 

अशातही आज कुवारबांव व्यापारी संघटनेने त्याबाबत आक्षेप अल्याचे निवेदन देत प्रशासनातर्फे सुरू असलेल्या मोजणी प्रक्रियेतील वातावरण गंभीर केले. गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेल्या रत्नागिरी मिर्‍या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी जमीन मोजणीला अखेर गुरूवारपासून सुरुवात झाली आहे. रुंदीकरण करताना कुवारबांव बाजारपेठेत 30 मीटरचेच रूंदीकरण करण्यात यावे, या मागणीवर कुवारबांव व्यापारी संघ ठाम आहे. आजही या विरोधाचे पत्र अधिकार्‍यांना देण्यात आले. दरम्यान, कुवारबांव व्यापारी संघाचा विरोध असल्यामुळे पोलिस बंदोबस्तामध्ये या मोजणीला सुरुवात झाली.

मिर्‍या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी कुवारबांव येथे रुंदीकरणासाठी 45 मीटरचे रुंदीकरण न करता दोन्ही बाजूला 15-15 मीटरचेच रुंदीकरण करावे, अशी व्यापारी संघाची मागणी आहे. मात्र, प्रशासनाने 45 मीटर रुंदीकरणाची भूमिका घेतल्याने यापूर्वी व्यापार्‍यांनी आक्रमक भूमिका स्वीकारुन संपूर्ण कुवारबांव बाजारपेठ बंद ठेवत गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरला दुकान बंद आंदोलन केले होते. त्यानंतरही हा प्रश्‍न अधिक चिघळत चालला होता.

मध्यंतरी सुरु झालेली मोजणी बंद पाडण्यात आली होती. त्यानंतर गुरूवारी पुन्हा प्रशासनाकडून जमीन मोजणीला सुरुवात झाली. दोन दिवस ही मोजणी चालणार आहे. पण या पूर्वीची विरोधाची पार्श्‍वभूमी माहीत असल्याने यावेळी मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही मोजणी सुरु करण्यात आली.

... त्यावर पुढील आंदोलनाची दिशा 

कुवारबांव व्यापारी संघाचं एक शिष्टमंडळ दिल्लीत मंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेलं असल्यामुळे  गुरुवारी मोजणीला तसा विरोध झाला नाही. फक्त या मोेजणीच्या विरोधाचे एक पत्र संबंधित अधिकार्‍यांना  देण्यात आले. दिल्लीत गेलेल्या शिष्टमंडळाला या वादाबाबत काय आश्‍वासन मिळते, यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरण्यात येणार सल्याची माहिती संघर्ष समितीचे राजेश तोडणकर यांनी दिली.