Thu, Jun 20, 2019 14:45होमपेज › Konkan › अकरा एलईडी नौका पकडल्या

अकरा एलईडी नौका पकडल्या

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 23 2018 1:18AMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

सहायक मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकार्‍यांनी सागरी सुरक्षा पोलिस आणि तटरक्षक दलाच्या मदतीने जनरेटरवर एलईडी लावून मासेमारी करणार्‍या 11 मच्छीमार नौकांवर कारवाई केली. यामध्ये दोन पर्ससीननेट नौका असून इतर जनरेटरवर एलईडी वापरून मासेमारी करणार्‍या नौका आहेत. काही बोटींवरील एलईडी लाईट फोडून वायर कापण्याच्याही घटना घडल्याने मच्छीमार संतप्त झाले होते. भगवती बंदर आणि पावस समुद्रात ही कारवाई करण्यात आली. ही मोहीम पुढे सुरूच राहणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

पर्ससीननेट मच्छीमार नौकांवरील एलईडी लाईट यंत्रणा वापरण्याबाबत नुकतीच जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक झाली. त्यावेळी मच्छीमारांनी परिपत्रकानुसार कारवाई केली जात असून ती चुकीची असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर जिल्हाधिकार्‍यांनी मत्स्य व्यवसाय आयुक्तांकडून त्या परिपत्रकासंदर्भात अभिप्राय मागवून घेण्याची सूचना केली होती. मात्र, हा अभिप्राय येण्यापूर्वीच कारवाई झाल्याने मच्छीमार वर्ग कोणत्या आधारावर कारवाई होत आहे, याबाबत संभ्रमात पडला आहे.

मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त आनंदाराव साळुंखे, प्राधिकरण विकास अधिकारी विजय कांबळे, परवाना अधिकारी डी. जे. जाधव, जे. डी. सावंत, आर. बी. मालवणकर, संतोष देसाई यांच्या पथकाने ही कारवाई केली. सागरी सुरक्षा दलाचे 15 पोलिस, तटरक्षक दलाचे जवान आणि तिन्ही विभागांच्या तीन गस्ती नौकांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

कारवाई झालेल्या बोटींमध्ये मिरकरवाड्यातील महंमद दर्वे यांची उम्मे कुलसुंब, जुम्मा बी. दर्वे यांची खतिज सानिया, अस्लाम पांजरी यांची सुफिया आयशा, इस्माईल दर्वे यांची अमिना अजिजा, खलील मिरकर यांची सईद महंमद रजीम, राजीवड्यातील माईद्दीन फणसोपकर यांची सुल्तान आजमान, भाट्येतील दाऊदमियाँ भाटकर यांची अखलाखी, भगवती बंदर येथील शंकर पालशेतकर यांची जरीमरी तिसाई, जयगडातील शौकत डांगे यांची एम. साहील एम. राहिल, देवगडातील जितेंद्र धुरी यांची काळबादेवी, उरण येथील विनायक माखवा यांची श्री विघ्नहर्ता  या बोटींवर ही कारवाई झाली आहे. या नौकांवर एलईडी लाईट वापरल्याच्या आरोपाखाली तहसीलदारांकडे खटले दाखल करण्यात येणार आहेत.