Thu, Dec 12, 2019 23:52होमपेज › Konkan › सेनेची पकड ढिली करण्याचा प्रयत्न

सेनेची पकड ढिली करण्याचा प्रयत्न

Published On: Apr 22 2018 11:21PM | Last Updated: Apr 22 2018 9:38PMराजापूर  : प्रतिनिधी

निसर्गसंपन्न कोकणात पर्यावरणाची  हानी करणारे विनाशकारी प्रकल्प येवू नयेत, म्हणून होत असलेल्या आंदोलनात शिवसेनेने सदैव प्रकल्प विरोधकांना भक्कम आधार दिला आहे. तशीच भूमिका  रिफायनरीच्या लढ्यात सेनेने सध्या घेतलेली आहे.  मात्र  राजकीय कुरघोडी करताना रिफायनरीचा वापर करुन या तालुक्यावरील सेनेची पोलादी पकड ढिली करायची असे कारस्थान काहींकडून सुरु आहे.

जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाविरुध्द शिवसेनेने विरोधाचे मोहळ उठवले होते. राजापूरचे आमदार राजन साळवी व त्यांच्या सहकार्‍यांनी अणुऊर्जा प्रकल्पाला सुरवातीपासूनच  कडाडून विरोध दर्शविला होता. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व सेनेच्या अनेक नेत्यांनी जैतापुरात येवून प्रकल्पाविरुध्द रणशिंग फुंकले होते. तर एका आंदोलनादरम्यान आमदार राजन साळवी व त्यांचे अनेक सहकर्‍यांनी जैतापूरवासीयांच्या हितासाठी  तुरुंगवास देखील भोगला होता. सेनेच्या प्रखर विरोधामुळेच जैतापूरचे आंदोलन देशाच्या कानाकोपर्‍यात पसरले होते. तशाच प्रकारचा विरोध नाणारच्या रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेने सध्या सुरू केला आहे.

सुरवातीच्या अनिश्चीततेनंतर जेव्हा राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात रिफायनरी प्रकल्प येणार हे निश्चीत झाले तेव्हा प्रकल्पाला विरोध सुरु झाला. त्यावेळी शिवसेनादेखील त्यामध्ये सहभागी झाली होती. गतवर्षी जून महिन्यात शाळा बंद आंदोलनादरम्यान रिफायनरी प्रकल्पाच्या अधिसूचनेची जाहीर होळी करण्यात आली. त्यावेळी आंदोलकांसह आमदार राजन साळवी व त्यांचे सहकारी यांनीदेखील त्या अधिसूचनेची होळी केली होती. त्यानंतर शिवसेनेचे आमदार राजन साळवी व सेनेचे कोकणातील आमदारांनी विधिमंडळाच्या मुंबई व नागपूर अधिवेशनादरम्यान हा प्रकल्प कसा विनाशकारी आहे. त्यामुळे कोकणची राखरांगोळी कशी होईल ते सभागृहात व त्याबाहेर  पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. 

खासदार विनायक राऊत यांनी देखील प्रकल्पाविरुध्द शिवसेना जोरदार आवाज उठविल असे स्पष्ट करताना रिफायनरी प्रकल्पाबाबत जनतेशी बोलू, असे सांगणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नाणारमध्ये यावे व जनमत घेवून तात्काळ निर्णय घेण्याचे आवाहन केले होते. सेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीदेखील कोकणी माणसाच्या विरोधात उठणार्‍या भाजपवर हल्लाबोल केला होता. असले विनाशकारी प्रकल्प आणून कोकणची राख तर चांगले प्रकल्प गुजरातला नेवून तेथे रांगोळी असे धोरण असल्याची टीका केली होती. शिवसेनेची प्रकल्पविरोधात स्पष्ट भूमिका असताना काही मंडळींनी कुटील डाव खेळत शिवसेनेवर टीका करण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

मागील दोन दशकांहुन अधिक काळ या तालुक्यावर शिवसेनेची सत्ता आहे. तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायती, जिल्हा परीषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक सेनेकडे असून सागवे, नाणार परीसरावर सेनेचे असलेले वर्चस्व कमी करुन आपला जनाधार वाढवायचा अशा हेतूने  काही पक्ष रिफायनरीच्या आंदोलनात उतरले आहेत.

अणुऊर्जा प्रकल्पावरुन देखील सेनेच्या साम्राज्याला हादरे देण्याचे प्रयत्न झाले पण ते असफल ठरले  होते. त्यानंतर आता रिफायनरी  प्रकल्पाला पुढे करुन सेनेला पुन्हा टार्गेट केले जात आहे.पण  आजवर असंख्य आव्हाने यशस्वीपणे परतवून लावणारी शिवसेनादेखील पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हे आव्हान परतवायला सज्ज झाली आहे.
Tags : ratnagiri election shivsena