Wed, Aug 21, 2019 20:01होमपेज › Konkan › संपामुळे ‘एसटी’चे ८० लाखांचे नुकसान

संपामुळे ‘एसटी’चे ८० लाखांचे नुकसान

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 10 2018 10:29PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

एसटी कामगारांचा अघोषित संप शनिवारी रात्री मागे घेतला गेला असला, तरी रविवारी संध्याकाळपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील वाहतूक म्हणावी तशी पूर्ववत झालेली नव्हती. सुमारे 20 ते 30 टक्के फेर्‍या बंदच होत्या. चालक, वाहक मंडळी वेळेत उपलब्ध न झाल्याने अनेक फेर्‍या रद्द कराव्या लागल्या. गेल्या दोन दिवसांत सुमारे 80 लाख रुपयांचे नुकसान महामंडळाला सहन करावे लागले. 

पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी एसटी कामगारांनी शुक्रवारपासून अचानक कामबंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातही प्रवाशांची फारच फरपट झाली. शुक्रवारी 30 टक्के फेर्‍याच झाल्या. तर दुसर्‍या दिवशी रविवारी हे प्रमाण 20 टक्क्यांवर आले. त्यामुळे हा संप चिघळतच जाणार की काय, अशी परिस्थिती होती. कामावर न आलेल्या कामगारांना निलंबनाच्या कारवाईची नोटीस बजावण्यात आली. तरीही दाद मिळत नसल्याचे पाहून नवीन भरतीच्या चालक, वाहकांना संपर्क साधून कामावर येण्यासाठी विनंती करण्यात आली. कारवाईची नोटीस आणि कामावर येण्याच्या विनंतीही यशस्वी होत नव्हती. या परिस्थितीत गेल्या दोन दिवसांत सुमारे 80 लाख रुपयांचे नुकसान महामंडळाला सहन करावे लागले. शनिवारी रात्री हा संप मिटल्याचे जाहीर झाल्यानंतर रविवारी जिल्ह्यातील एसटी वाहतूक पूर्ववत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, आंदोलनादरम्यान कामगार वर्ग आपापल्या गावी गेल्याने रविवारीसुद्धा संध्याकाळपर्यंत एसटी वाहतूक विस्कळीतच होती. 20 ते 30 टक्के फेर्‍या कमी झाल्या होत्या. त्याचबरोबर गाड्या विलंबाने सुटत होत्या. सोमवारपासून एसटी महामंडळाची वाहतूक पूर्ववत होईल, अशी अपेक्षा आहे.