Thu, Nov 14, 2019 06:42होमपेज › Konkan › जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षाच!

जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षाच!

Published On: Jun 26 2019 1:39AM | Last Updated: Jun 26 2019 12:10AM
रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

जिल्ह्याला पावसाची प्रतीक्षा असली तरी रत्नागिरी शहरासह  शहरालगतच्या नऊ ग्रामपंचायतींच्या गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू झाला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हरचिरी धरणासह रत्नागिरी नगर परिषदेच्या पानवल धरणात बर्‍यापैकी पाणीसाठा झाला असल्याने नियमित पाणीपुरवठा सुरू झाला आहे. 

रत्नागिरी तालुक्यात दरवर्षी जून महिन्यात पाऊस पडतो तसा यंदा पडला नाही. त्यामुळे शिरगाव, मिर्‍या, कुवारबांव, नाचणे, कर्ला, टिके, पोमेंडी, मिरजोळे, चिंद्रवली या गावांना औद्योगिक महामंडळाच्या हरचिरी धरणातून दिल्या जाणार्‍या पाण्यात कपात करण्यात आली होती. 17 मे पासून एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येत होता.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धरणातील पाणीसाठा इतका कमी झाला होता की धरणातील मृत पाणीसाठ्याचा पुरवठा करावा लागत होता. रत्नागिरी नगर परिषदेलासुद्धा देण्यात येणार्‍या पाणीपुरवठ्यात महामंडळाने मोठी कपात केली होती. सुदैवाने गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात 93 मि.मी. इतका पाऊस पडला. गेल्यावर्षी तब्बल 880 मि.मी. इतकी पावसाची नोंद झाली होती. तोही हरचिरी, शिळ, पानवल धरण क्षेत्रातही बर्‍यापैकी कोसळल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे आतापर्यंत हरचिरी धरणातील एका पंपाऐवजी दोन पंपांद्वारे पाणी खेचून ते पुरवणे शक्य झाले आहे. त्यामुळे नऊ ग्रामपंचायतींसह शहरालाही महामंडळाच्या धरणातील पाणी मिळू लागले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पानवल धरणातील पाणीसाठा फेब्रुवारी महिन्यातच संपुष्टात आला होता. त्यात एमआयडीसीच्याही पाणी पुरवठ्यात कपात झाल्याने प्रथम दर सोमवारी शहराचा 
पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला. तरीही पाण्याची बोंबाबोंब होऊ लागली. अनेक भागात पाणी मिळतच नव्हते. जेथे मिळत होते तेथे पाण्याला दाब नव्हता. परिणामी रोजच्या रोज शहरातील कुठल्या ना कुठल्या तरी भागातील महिला रत्नागिरी नगर परिषदे येऊन पाण्याची मागणी करत होत्या.

शहराच्या पाणी पुरवठ्यातील या समस्या सोडवण्यासाठी पाणी कपातीचा उपायसुद्धा त्रासदायक ठरत होता. पावसाच्या आगमनाला विलंब झाल्याने ही समस्या गंभीर होणार की काय? अशी परिस्थिती असतानाच गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावली. हरचिरी धरणासह कोरड्या झालेल्या पानवल धरणात तसेच शिळ धरणात पाऊस पडल्याने धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली. पानवल धरणाचे पाणी मिळू लागले. महामंडळाने केलेली पाणी कपात रद्द केली. त्यामुळे नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी पाणी पुरवठा नियमित करण्याच्या  सूचना केल्या. त्यामुळे रत्नागिरी संपूर्ण शहराला मंगळवारपासून नियमित पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.