Mon, Jun 24, 2019 20:59होमपेज › Konkan › जिल्ह्यातील १ हजार २२५ शाळा दुर्गम

जिल्ह्यातील १ हजार २२५ शाळा दुर्गम

Published On: Jan 06 2018 1:23AM | Last Updated: Jan 05 2018 11:05PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

जिल्हांतर्गत बदल्यांसाठी दुर्गम व सुगम शाळांच्या यादीवर शिक्षण समितीच्या सभेत चर्चा झाली. सदस्यांनी सुचवलेल्या यादीनुसार दुर्गम क्षेत्रातील शाळांची संख्या 300ने वाढली आहे. जिल्ह्यातील 2 हजार 714 प्राथमिक शाळांपैकी 1 हजार 225 शाळा दुर्गम क्षेत्रात निश्‍चित करण्यात आल्या असल्याचे शिक्षण सभापती दीपक नागले यांनी सांगितले. यापूर्वी 925 शाळा दुर्गम क्षेत्रात होत्या. 

शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीत सुगम आणि दुर्गम शाळांचा आढावा घेण्यात आला. फेब्रुवारी 2018 मध्ये होणार्‍या शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी सुगम आणि दुर्गम शाळांची यादी निश्‍चित करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. स्थायी समितीमध्ये झालेल्या निर्णयानुसार जि. प. सदस्यांच्या सूचनानुसार आणि बांधकाम अधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांच्या समितीकडून सुगम आणि दुर्गम यादी तयार करण्यात आली. या याद्या तशाच ऑनलाईन व्हाव्यात, यासाठी शिक्षण सभापती यांनी सीईओंची भेट घेतली. सीईओंनी या याद्या बीओंकडे देऊन बांधकामच्या अधिकार्‍यांमार्फत याद्या अंतिम करून घेण्याची सूचना केली आहे. बांधकामचा अभिप्राय आल्यानंतर या याद्यांवर निर्णय घेण्यात येणार आहे. 

तसेच शिक्षणाची वारी 11 ते 13 जानेवारीदरम्यान रत्नागिरी होणार आहे. जिल्ह्यातील 300 अप्रगत शाळांची या वारीसाठी निवड झाली आहे. परंतु, या वारीचा सर्व शाळां मधील शिक्षकांना फायदा व्हावा यासाठी निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण सभापती नागले यांनी सांगितले. यामध्ये मंडणगड, खेड आणि दापोलीतील शिक्षकांसाठी 11 जानेवारी, चिपळूण, गुहागर आणि संगमेश्‍वरसाठी 12 आणि रत्नागिरी, लांजा आणि राजापूरसाठी 13 जानेवाी ही तारीख निश्‍चित करण्यात आली आहे. सकाळ सत्रात शाळा घेऊन या तालुक्यातील शिक्षक दुपारी तीन वाजल्यानंतर या वारीसाठी हजर राहू शकतील, असे सभापती नागले यांनी सांगितले.