Mon, Mar 25, 2019 04:55
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › जिल्ह्यात मुसळधार; रत्नागिरी-गणपतीपुळे रस्ता बंद

जिल्ह्यात मुसळधार; रत्नागिरी-गणपतीपुळे रस्ता बंद

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 10 2018 10:38PMरत्नागिरी : प्रतिनिधी

गेल्या तीन दिवसांपासून कोसळणार्‍या पावसाने रविवारी रौद्ररूप धारण केल्याने रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. सखल भागांत पाणी साचल्याने त्या भागाला तलावाचे स्वरूप आलेे. त्याचप्रमाणे पुलावरून वाहणारे पाणी, रस्त्यांवर पडलेली झाडी आणि दरडी यामुळे अनेक मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली होती. घर, गोठ्यांवर झाडे कोसळून नुकसान झाले. 

रत्नागिरी तालुक्यातील मुख्य बाजारपेठेत गोखले नाका येथे एक फूट पाणी साचल्याने वाहनचालकांना त्यामधून वाहने काढताना कसरत करावी लागत होती. कुवारबाव येथील सखल भागात दोन ते अडीच फूट पाणी साचल्याने अनेक दुचाकी अडकून पडल्या होत्या. शहरातील पॉलिटेक्निककडे जाणार्‍या मार्गावरही पाणी साचले होते. कुरणवाडी येथील दीपक शंकर धावडे यांच्या घरावर झाड कोसळून अंशतः नुकसान झाले. रनपार येथील नंदकुमार सुर्वे यांच्या घरात पाणी घुसले. 

पेठ-पूर्णगड येथे रामा डोर्लेकर यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले. कासारवेली येथेही रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. येथील मराठी शाळेजवळ झाड कोसळल्याची घटना घडली. त्यापुढे बसणी येथे रस्त्यांवर पाणी साचल्याने रत्नागिरी-गणपतीपुळे वाहतूक ठप्पा झाली होती. टेंबेपूल येथे पुलावरून पाणी जात असल्याने या मार्गावरील वाहतूकही खोळंबली होती. कोतवडे-मुस्लिमवाडी येथेही पुलावरून पाणी वाहत होते.

मांजरे येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने राई-भातगाव-गुहागर मार्ग बंद होता. याठिकाणी दोन्ही बाजूंना वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. ही दरड हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी रवाना झाले होते. दरड हटवल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. 

चिपळूण तालुक्यातील कुटरे येथील महादेव धौंडकर यांचा गोठा कोसळून दोन बैल व 1 वासरू जखमी झाले. रत्नागिरी-कापसाळ मार्गावर झाड कोसळल्याने येथील वाहतूक थांबली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परतेने हे झाड हटवले. चिपळूण-गुहागर मार्गावरील गोंधळे येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने रात्रीची चिपळूण-चिवेळी बस अडकली होती. 

संगमेश्‍वर तालुक्यातील सोनगिरी येथील रामचंद्र लक्ष्मण शिंदे यांच्या घरावर दगड कोसळली. राजापूर तालुक्यातील कशेळी येथील पांडुरंग पाटील यांच्या गोठ्यात शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत गोठ्याचे 12 हजार रुपयांचे नुकसान झाले. राजापूर येथे झाड कोसळल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

रत्नागिरी तालुक्यात पावसाचे थैमान

जोरदार पावसामुळे शहरातील जेलरोड, गोखले नाका, निवखोल येथील गटारे तुंबून पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले होते. मात्र, पाऊस थांबल्यानंतर हे पाणी ओसरलेे. निवखोलात एका घरात पाणी घुसले. शिरगाव फिशरीज कॉलेज येथेही एका घरात पाणी शिरले. त्याचबरोबर येथील पेट्रोल पंपाजवळचे झाड कोसळले होते. कासारवेली गावातही पाणी साचले होते. पांगरी-देवरूख मार्गावर मोठा दगड रस्त्यावर आला होता. रत्नागिरी तालुक्यातील वायंगणी येथे जयवंत शिंदे आणि अनिल पाटील यांच्या घरांमध्ये पाणी शिरले.