Tue, Jul 16, 2019 01:42होमपेज › Konkan › जिल्ह्याला पावसाने झोडपले

जिल्ह्याला पावसाने झोडपले

Published On: Jun 23 2018 10:44PM | Last Updated: Jun 23 2018 10:04PMरत्नागिरी : प्रतिनिधी

गेल्या शनिवारी सक्रिय झालेल्या पावसाने या शनिवारीही संततधार सुरूच ठेवत जिल्ह्याला झोडपून काढले. पावसाने आगेकूच सुरूच ठेवताना गतवर्षीच्या तुलनेत एकूण 3200 मि. मी.ची आघाडी घेतली असून, सरासरी तुलनेत पावसाने साडेतीनशे मि. मी. ची सरशी साधली आहे. दरम्यान, शनिवारी सर्वाधिक पाऊस दापोली तालुक्यात तर सर्वात कमी पर्जन्यमान चिपळूण तालुक्यात नोंदविले गेले.

दरम्यान, मुसळधार पावसात  मासेमारीसाठी गेलेली एक व्यक्ती गाळात अडकल्याची घटना लांजा तालुक्यात घडली. मात्र, अद्यापही त्याचा शोध लागला नसल्याचे जिल्हा नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. पावसाचा जोर आगामी तीन दिवस राहणार असल्याचा संदेश भारतीय हवामान विभागाने (आयएमडी)दिला असून कोकण किनारपट्टीलाही उधाणाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तविली आहे.

जिल्ह्यात आठवडाभर पावसाचा जोर वाढला आहे. 21 ते 26 जूनपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तविली आहे. दररम्यान, शनिवारी सर्वाधिक पाऊस दापोलीत झाला. दापोली तालुक्यात 218 मि. मी. पावसाची नोंद झाली तर चिपळूण तालुक्यात सर्वात कमी म्हणजेे  केवळ 23 मि. मी. पावसाची नोंद झाली. शनिवारी जिल्ह्यात 93. 89 मि. मी.च्या सरासरीने 845 मि. मी. पाऊस झाला. आतापर्यंत जिल्ह्यात  816 . 28 मि. मी.च्या सरासरीने एकूण 7346 मि. मी. पाऊस झाला. गतवर्षी याच दिवशी 459.23 मि.मी च्या सरासरीने 4133 मि. मी. पावसाची नोंद झाली होती. गतवर्षाच्या तुलनेत या वर्षी पावसाने 3200 मि. मी. आघाडी घेतली असून सरासरी तुलनेतही गतवर्षाच्या पावसाला साडेतीनशे मि. मी. ने मागे टाकले आहे. मध्यंतरी गायब  झालेल्या पावसाने जून महिन्यात खरिपाचे वेळापत्रक बदलण्याची शक्यता होती. मात्र, पावसाने पुनरागमन करीत जोर धरल्याने कृषी वर्गातही लावणीची कामे वेगाने पूर्ण झाली  आहेत. आता लावणीची तयारी जिल्ह्याच्या खरीप लागवड क्षेत्रात सुरू झाली आहे. 

गेल्या शनिवारी पुनरागमन केलेल्या पावसाने आठवडाभर जिल्ह्याला झोडपून काढले आहे. पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची ही मालिका जिल्ह्यात कायम राहणार आहे.
शनिवारी मुसळधार पावसामुळे अनेक  भागात पूरसदृश स्थिती  निर्माण झाली.  राजापूर आणि लांजा  तालुक्यांतील शहरी भागात जोरदार पाऊस झाल्याने बाजारपेठेत पाणी साचले होते. रत्नागिरी शहरातही मुसळधार पावसामुळे रामअळी आणि मांडवी परिसरात पाणी साचले. तर ताल्ाुक्याच्या ग्रामीण भागातही मुसळधार पावसाने रस्ते बाधित झाले होते. पोमेंडी येथे सोमेश्‍वर खाडीचे पाणी वाढल्याने येथील गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता होता. लांजा तालुक्यात बोर्र्डेेवाडी येथील धरणात मासेमारीसाठी  गेलेले वडगाव येथील गजेंद्र गोसावी हे बंधार्‍याच्या गाळात रुतले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यत त्यांचा शोध लागला नसल्याचे नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले तर अनेक भागात घराच्या पडझडीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.