Mon, May 27, 2019 07:23होमपेज › Konkan › पाणीटंचाईग्रस्त वाड्यांची पंचाहत्तरी

पाणीटंचाईग्रस्त वाड्यांची पंचाहत्तरी

Published On: Apr 25 2018 10:41PM | Last Updated: Apr 25 2018 10:14PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यातील जलस्तर घटू लागल्याने आता आठ तालुक्यांत पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे पहिला टँकर खेड तालुक्यात धावल्यानंतर आता टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या वाढू लागली आहे. मार्चअखेर सुरू झालेली पाणीटंचाई आता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात 28 गावांतील 75 वाड्यांपर्यंत पोहोचली आहे. यासाठी 17 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

उन्हाळ्यात टंचाईग्रस्त गाव आणि वाड्यांत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने  संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला होता. यामध्ये नऊ तालुक्यांमधील 260 गावे आणि 486 वाड्यांचा समावेश आहे.  ही टंचाई निवारण्यासाठी 5 कोटी 49 लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. 

आराखड्यात मंडणगड तालुक्यातील 19 गावांमधील 24 वाड्या, दापोलीतील 39 गावांमधील 72 वाड्या,  खेडच्या 45 गावांमधील 112 वाड्या, गुहागरातील 18 गावांमधील 41 वाड्या, चिपळूणच्या 30 गावांमधील 45 वाड्या, संगमेश्‍वरच्या 25 गावांमधील 51 वाड्या, रत्नागिरीच्या 28 गावांमधील 36 वाड्या, लांजातील 32 गावांमधील  60 वाड्या आणि राजापूर तालुक्यातील 24 गावांमधील 45 वाड्यांचा समावेश आहे.  मार्चअखेर पहिला टँकर खेड तालुक्यात धावल्यानंतर गुहागर, 

दापोली आणि लांजा तालुक्यांत पाणीटंचाईची तीव्रता वाढीस लागली आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील 65 वाड्या टंचाईमध्ये प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. मात्र, तेथील 4 गावांतील 13 वाड्यांना दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.  खेड तालुक्यात सात गावांत पाणीटंचाई सुरू असून येथील 17 वाड्यांमध्ये  चार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

दापोली तालुक्यात प्रस्तावित गावांपैकी 3 गावांतील 8 वाड्यांमध्ये दोन टँकर पाण्यासाठी धावू लागले आहेत. गुहागर तालुक्यात सहा गावांतील 12 वाड्या तहानलेल्या असून त्यांना तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मंडणगड आणि लांजा तालुक्यांत प्रत्येकी चार गावांत  अनुक्रमे दोन आणि 4 टँकर पाणीपुरवठा करीत आहेत. या दोन तालुक्यांतील 25 वाड्या  तहानलेल्या आहे. यामध्ये 16 वाड्या लांजा तालुक्यातील आहेत.
 
56 विहिरींचे अधिग्रहण

पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने 56 विहिरींचे अधिग्रहण करण्याचे प्रस्तावित केले आहे. तर 31 टँकरचे नियोजन केले आहे. त्यांपैकी ग्रामपंचायतस्तरावर खासगी तत्वावर 10 टँकर  धावत असून पाणीटंचाईसाठी आराखड्यानुसार केवळ सातच टँकर धावत आहेत. त्यामुळे प्रशासकीयस्तरावर  पाणीटंचाईसाठी धावणार्‍या टँकरची संख्या स्थानिक पातळीवर तजवीज केल्याने कमी असल्याचे निदर्शनास येत आहे.