Thu, Jun 20, 2019 14:40होमपेज › Konkan › तर जिल्ह्याचा विकास साधायचा कसा

तर जिल्ह्याचा विकास साधायचा कसा

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 09 2018 11:02PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार आधीच जिल्हा नियोजनचा निधी मिळत नाही. त्यात वार्षिक विकास आराखड्याला कात्री लावण्यात आली आहे. चालू वर्षाच्या 170 कोटींच्या आराखड्यातील 131 कोटी रुपये शासनाकडे प्रत्यार्पित करावे लागले. राहिलेल्या 39 कोटींत जिल्ह्याच्या 9 तालुक्यांमध्ये विकास कसा साध्य होणार? असा सवाल करून सेना आ. राजन साळवी यांनी विकासाबाबत जिल्ह्यावर होणार्‍या अन्यायाबाबतची तक्रार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

खा. विनायक राऊत यांच्यासोबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जिल्ह्याचा विकास कसा रखडला आहे हे सांगणार असल्याचे आ. साळवी यांनी सांगितले. कोकणातील बहुतांश जिल्ह्यांची हीच अवस्था असून कोकणातील सर्व आमदारांना संघटित करून आवाज उठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा विकास आराखडा बनविताना काही निकष आहेत. त्यात लोकसंख्या हा प्रमुख निकष आहे. या निकषानुसार रत्नागिरी जिल्ह्याचा विकास आराखडा 300 कोटी रुपयांचा आवश्यक आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या 8 लाख 49 हजार इतकी आहे. त्यांचा चालू निधी 159 कोटींचा आहे. त्याचवेळी रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या दुप्पट म्हणजे 16 लाख 15 हजार इतकी असून आराखडा 170 कोटींचा आहे. हे उदाहरण अन्यायासाठी पुरेसे बोलके असल्याचे आ. राजन साळवी यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यावरील हा अन्याय सरकारचा नाकर्तेपणा असल्याचेही ते म्हणाले. आम्ही सत्तेत असलो तरी हा अन्याय सहन करण्याजोगे नसल्याचेही आ. साळवी यावेळी म्हणाले.