Wed, Jun 26, 2019 17:56होमपेज › Konkan › जिल्ह्यात पावसाची संततधार!

जिल्ह्यात पावसाची संततधार!

Published On: Jun 21 2018 10:56PM | Last Updated: Jun 21 2018 10:55PMरत्नागिरी  : प्रतिनिधी

जिल्ह्यात पावसाने सातत्य ठेवले असून शहरी भागासहीत ग्रामीण भागातही पावसाने दाणादाण उडवून दिली. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 82.11 मि. मी. पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत (1 जूनपासून) 682 मि. मी. सरासरी  पाऊस झाला. गुरुवारी सर्वाधिक पावसाची नोंद राजापूर तालुक्यात झाली. आगामी चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून किनारपट्टी भागात उधाणाचा धोकाही संभावण्याची शक्यता आहे.  किनारी गावांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या असून मासेमारीसाठी सागरात न जाण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

बुधवारी जिल्ह्यात 82 मि. मी.च्या सरासरीने पाऊस झाला.  सकाळच्या सत्रात पावसाचा जोर थोडा  मंदावला असला, तरी सायंकाळी पावासाचा जोर वाढलेला होता. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही जनजीवनावर परिणाम झाला. जिल्ह्याच्या काही भागांत पाणी साचल्याने गावे संपर्क तुटण्याची शक्यता होती. मात्र, पावसाने थोडी उसंत घेतल्याने पाण्याचा निचरा झाल्याने संभाव्य धोका टळला असल्याचे नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. 

गुरुवारी सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या राजापूर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने शहरी भागासह ग्रामीण भागातही जनजीवन विस्कळीत झाले.  दिवसभारत संपलेल्या 24 तासांत खेड तालुक्यात 84, गुहागर तालुक्यात 148, रत्नागिरी 85,    आणि राजापूर तालुक्यात 264 मि. मी. पावसाची नोंद झाली. तर अन्य तालुक्यांतही पावसाने हजेरी लावली होती. त्यांपैकी मंडणगड आणि दापोली तालुक्यांत अनुक्रमे 3 आणि 7 मि. मी. पावसाची नोंद झाली. तर चिपळूण  आणि लांजा तालुक्यात अनुक्रमे  45 आणि 41 मिमी पर्जन्यमान नोंदविले. जिल्हा नियंत्रण कक्षात दिवसभरात 45 लाखांच्या नुकसानीची नोंद करण्यात आली.  मात्र जीवितहानी झाली नसल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली

गुहागरला पावसाचा तडाखा गुहागर/गिमवी : प्रतिनिधी

गुहागरमध्ये जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी गटाराचे पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे अनेक ठिकाणी गैरसोय निर्माण झाली.गुहागरमध्ये रात्रभर कोसळलेल्या  पावसामुळे साकवी भागाला नदीचे स्वरुप आले होते. रस्त्याच्या दुतर्फा असलेली गटारे मोकळी न केल्याने पाणी तुंबले. साकवीवरील गोयथळे यांच्या दोन घरांत, एका पंपहाऊसमध्ये पाणी शिरले. वरचापाट येथील नगरसेवक समीर घाणेकर यांच्या घरासमोरील रस्त्याचे रुपांतर नदीत झाले होते.

गुहागर, वेळणेश्‍वर, हेदवी या तालुक्याच्या  किनारपट्टी भागाला पावसाने तडाखा दिला.  किनारपट्टीवरील अनेक भागात पाणी शिरले. गिमवी-मुंढर या रस्त्यावर  गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक बंद झाली होती. तसेच विद्युतपुरवठा खंडित झाला होता.

आंजर्ले आरोग्य केंद्राचा भाग कोसळला दापोली : प्रतिनिधी 

तालुक्यातील आंजर्ले आरोग्य केंद्र इमारतीचा मागील भाग कोसळला. ही घटना 21 रोजी सकाळी 10 वाजता घडली.  यावेळी आरोग्य केंद्रात येथील वैद्यकीय अधिकारी परिचारिका आरोग्य केंद्रात होते. आंजर्ले आरोग्य केंद्र इमारतीचे बांधकाम 1962 सालचे आहे. या इमारतीला तडे गेले असून लाकडी वाशिक कुजलेले आहे. संपूर्ण  इमारत धोकादायक असून कधीही कोसळेल, अशी अवस्था झाली आहे. इमारत दुरुस्त व्हावी, म्हणून येथील समितीने अनेकवेळा आरोग्य विभागाकडे दुरुस्ती प्रस्ताव पाठवले आहेत. मात्र, आरोग्य विभागाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे आरोग्य केंद्रात येणार्‍या रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

कशेळीत रस्ता खचला राजापूर : प्रतिनिधी

मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यात हाहाकार उडाला आहे. पावसामुळे आडीवरे वाडापेठ बाजारपेठेत पाणी शिरले, तर कशेळी दुर्गावाडी येथील रस्ता खचला असून राजवाडी येथील साकवावरील स्लॅब वाहून गेला आहे.

कशेळी दुर्गावाडी येथील रस्ता अतिवृष्टीत खचल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या घटनेची माहिती मिळताच राजापूर तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच तहसील कार्यालयामार्फत खार बंधारे कार्यालयालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बुधवारी रात्री महामार्गावर उन्हाळे कुंभारवाडी येथे झाड कोसळून पडल्याने काही वेळासाठी वाहतूक खोळंबली होती. गुरूवारी पावसाचा जोर कायम होता.