Wed, Jul 24, 2019 12:34होमपेज › Konkan › जिल्ह्यात बँक कर्मचार्‍यांचा संप

जिल्ह्यात बँक कर्मचार्‍यांचा संप

Published On: May 31 2018 1:39AM | Last Updated: May 30 2018 11:57PMरत्नागिरी : प्रतिनिधी

वाजवी व न्याय्य वेतनवाढ मिळावी, 11 वा द्विपक्ष करार त्वरित मिळावा, 1 ते 7 पर्यंतच्या श्रेणीतील सर्व अधिकारी यामध्ये समाविष्ट करावेत, या प्रमुख मागण्यांसाठीचा बँक कर्मचारी, अधिकार्‍यांनी दोन दिवस देशव्यापी संप पुकारला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बँक कर्मचार्‍यांनी संपात सहभागी होत हा संप यशस्वी केला आहे.

‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ या शिखर संघटनेने पुकारलेल्या या संपात ए.आय.बी.ई.ए., ए.आय.बी.ओ.सी., ए.आय.बी.ओ.ए.सह एकूण 9 संघटना व त्यांचे दहा लाखांहून अधिक सभासद सहभागी झाले होते. इंडियन बँक्स असोसिएशन व भारत सरकारने दिलेला केवळ 2 टक्के पगारवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावताना व सरकारच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी पुकारलेल्या या संपात देशभरातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया, जुन्या खासगी बँकांतील कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते.

दि. 1 नोव्हेंबर 2017 पासून देय असलेला 11 वा वेतनाढीचा द्विपक्ष करार लवकरात लवकर करावा, यासाठी पुकारलेल्या संपात रत्नागिरीतील बँक कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. संपकरी कर्मचार्‍यांनी सकाळी बँक ऑफ महाराष्ट्र समोर जमून निदर्शने केली. दि. 31 मे रोजीही संप करण्यात येणार असून गाडीतळ येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. या संपात ए.आय.बी.ई.ए.चे पदाधिकारी राजेंद्र गडवी व विनोद आठवले, विश्‍वनाथ आडारकर यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.