Sat, Jan 25, 2020 06:46होमपेज › Konkan › डिंगणी रेल्वे मार्गाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार

डिंगणी रेल्वे मार्गाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार

Published On: Dec 12 2017 2:06AM | Last Updated: Dec 11 2017 11:11PM

बुकमार्क करा

त्नागिरीः प्रतिनिधी

डिंगणी-जयगड रेल्वे मार्गाबाबत ग्रामस्थांना विश्‍वासात न घेताच ठेकेदाराला पाठीशी घालत प्रशासन करीत असलेल्या अन्यायाविरोधात ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. डिंगणी-जयगड रेल्वे मार्गाविरोधात खाडीपट्ट्यातील 9 गावांनी संघर्ष कृती समिती स्थापन केली आहे. गेल्याच आठवड्यात या समितीने 700 ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करुन परिसरात सुरू असलेले रेल्वे मार्गाचे काम बंद पाडले होते. त्या पाठोपाठ आता डिंगणी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

डिंगणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केलेल्या निवेदनात रेल्वे मार्गासाठी जमीन संपादित करण्याची नोटीस मिळाल्यापासूनच येथील ग्रामस्थांनी प्रकल्पाला विरोध सुरू केला आहे. त्यानंतर केलेल्या पत्रव्यवहारानंतर प्रशासनाने ग्रामस्थांना कोणताही त्रास होणार नाही तसेच जबरदस्तीने प्रकल्प लादला जाणार नाही, भूसंपादन करताना ग्रामस्थांना प्रकल्पाचा आराखडा दाखवून मगच पुढचे काम होईल, असे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र, सध्या सुरू केलेल्या कामाची पाहणी केली असता संबंधित ठेकेदाराने ग्रामस्थांच्या खासगी जागेवरच अतिक्रमण केले आहे. तसेच शेतीकामे करणार्‍या शेतकर्‍यांना धमक्याही दिल्या असल्याचा संघर्ष समितीचा आक्षेप आहे. या विरोधात केलेल्या तक्रारींची प्रशासनाने दखल  तर घेतली नाहीच उलट जिंदलचे अधिकारी व ठेकेदार सातत्याने ग्रामस्थांना धमकावत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या कामासंदर्भात ठेकेदार व कंपनीशी प्रशासनाचे साटेलोटे असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.

या विरोधात न्याय मागण्यासाठी सोमवारी दुपारी 1 ते 5 या वेळेत  रत्नागिरीतील मराठा हॉलपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. शहरातील मराठा भवन येथे ग्रामस्थांची सभा घेतली. त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर थडकला.