Tue, Apr 23, 2019 23:34होमपेज › Konkan › ‘रनप’चा लिपिक लाच घेताना जेरबंद

‘रनप’चा लिपिक लाच घेताना जेरबंद

Published On: Aug 24 2018 10:35PM | Last Updated: Aug 24 2018 10:35PMरत्नागिरी : प्रतिनिधी

घर बांधण्यासाठी ‘सीआरझेड’ कायद्यामध्ये शिथिलता मिळवून घर उभारणीस परवानगी देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या  रत्नागिरी नगरपरिषदेतील  बांधकाम विभागातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. शुक्रवारी दुपारी मारुती मंदिर येथील एका हॉटेलच्या बाहेर ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ‘रनप’तील ‘सीआरझेड’ परवानगीच्या आलेल्या प्रस्तावांची माहिती मागवली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आनंदा नानासो थोरात (वय 48) या लिपिकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सुधारित 2018 अन्वये कारवाई केली आहे. नगरपरिषदेच्या इतिहासात कर्मचार्‍यावर प्रथमच अशी कारवाई झाली आहे. संशयित आनंदा थोरात बांधकाम विभागातील ‘सीआरझेड’ संदर्भातील कामे पहात होता.

एका तक्रारदाराने काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार, तक्रारदार यांचे रत्नागिरी शहरातील घर ‘सीआरझेड’मध्ये येत होते. त्यामुळे घराच्या बांधकामाची परवानगी मिळण्यासाठी त्यांनी नगरपरिषदेच्या बांधकाम विभागातील लिपिक आनंदा थोरात यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. त्यांचा प्रस्ताव लवकरात-लवकर पुढे पाठवण्यासाठी थोरातने तक्रारदाराकडे 12 हजार रुपयांची लाच मागितली होती. ‘सीआरझेड’मध्ये शिथिलता मिळण्यासाठी ‘रनप’कडे आलेला प्रस्ताव मुंबईतील पर्यावरण विभागाच्या समितीकडे पाठवावा लागतो. ही कार्यवाही करण्यासाठी 12 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यातील 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना थोरातला पकडण्यात आले.

तक्रारदाराने 16 ऑगस्ट रोजी लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार दिली होती. तक्रारीच्या अनुषंगाने 23 ऑगस्ट रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. तेव्हा थोरात यांनी तक्रारदाराकडे परवानगीचा प्रस्ताव पुढे पाठवण्यासाठी एकूण लाचेपैकी 5 हजार रुपये शुक्रवारी घेऊन येण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी12.40 वा. सुमारास लाचलुचपत विभागाने मारुती मंदिर येथिल गोपाळ हॉटेल बाहेर सापळा रचून थोरातला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र रानमाळे, पोलिस निरीक्षक तळेकर यांच्या पथकाने केली.