Sat, Jul 20, 2019 10:45होमपेज › Konkan › ‘हिरानंदानी’च्या गॅस पाईपलाईनचा मार्ग बदला

‘हिरानंदानी’च्या गॅस पाईपलाईनचा मार्ग बदला

Published On: Apr 25 2018 10:41PM | Last Updated: Apr 25 2018 10:07PMरत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी तालुक्यातील वाटद-कोंडवाडी गावामधून हिरानंदानी कंपनीसाठी गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. ही पाईपलाईन ज्या गावातून जाणार आहे, तेथे पिढ्यान् पिढ्या राहणारा शेतकरी नेस्तनाबूत होणार आहे. त्यांच्या जमिनी व घरे या वायूवाहिनीमुळे उद्ध्वस्त होणार आहेत. यामुळे या पाईपलाईनच्या मार्गात बदल करावा, अशा मागणीचे निवेदन बहुजन विकास आघाडीतर्फे जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

ही गॅस पाईपलाईन 18 मीटर रूंदीच्या पट्ट्यातून जाणार असून 30 इंच व्यासाची आहे. तसेच ती जमिनीच्या पृष्ठ भागाखाली 1 मीटर खोल टाकण्यात येणार आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना यापुढे आंबा, काजू, फणस इत्यादी कुटुंबासाठी उत्पादन देणारी झाडे लावता येणार नाहीत. त्यामुळे उपजीविकेचे साधनही राहणार नाही. तसेच घरही बांधता येणार नाहीत.

कंपनीने हमी पत्रामध्ये दुर्दैवाने काही अपघात उद्भवल्यास त्याची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवली आहे. पण जर दुर्दैवाने दुर्घटना झाल्यास गावाच उद्ध्वस्त होईल, पण भरपाई तरी कोणाला देणार? त्यापेक्षा जर कंपनीला गॅस पाईपलाईनसाठी जागा हवी असल्यास ती वस्तीच्या बाहेरून नेण्यात यावी आणि त्या जमिनीचा योग्य मोबदला जागा मालकाला देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली असून याचा विचार न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

हे निवेदन देताना बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे, जिल्हाप्रमुख तानाजी कुळये, तालुकाप्रमुख टी.एस. दुडये, शहरप्रमुख अजय वीर आणि भारत मुक्ती मोर्चाचे अप्पासाहेब सोनावणे उपस्थित होते.