Thu, Mar 21, 2019 11:44होमपेज › Konkan › ‘सिव्हिल’मध्ये होताहेत कर्करोग शस्त्रक्रिया

‘सिव्हिल’मध्ये होताहेत कर्करोग शस्त्रक्रिया

Published On: Jul 11 2018 10:21PM | Last Updated: Jul 11 2018 10:13PMरत्नागिरी : अनिकेत पावसकर 

कर्करोगावरील उपचारांमध्ये महत्त्वाची असणारी किमोथेरपी राज्यातील 11 जिल्हा रुग्णालयांमध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने कायमस्वरूपी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती शासनाकडून नुकतीच देण्यात आली आहे. मात्र, रत्नागिरीत 2015 पासूनच कर्करोगावरील शस्त्रक्रिया सुरू असून चिपळूणचे डॉ. विक्रम घाणेकर सामाजिक जबाबदारी म्हणून विनामूल्य सेवा देत आहेत. ऑगस्ट 2015 पासून गत महिन्यापर्यंत एकूण 967  रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, 55 रुग्णांचे निदान निश्‍चित झाले तर यातील 43 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

शासनाचा हा निर्णय स्तुत्य आहे. कारण देशात 1990 मध्ये संसर्गजन्य रोगांमुळे मृत्यूचे प्रमाण 60.9 टक्के होते. ते घटून 2016 पर्यंत 32.7 टक्के झाले आहे. परंतु, असंसर्ग रोगांमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण 1190 मध्ये 30.5 टक्के होते. ते 2016 मध्ये 55.4 टक्के झाले होते. म्हणजेच असंसर्गजन्य रोगांमुळे मृत्यूचे  प्रमाण वाढले होते. म्हणून शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये  1 जानेवारी 2015 पासून राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यात 30 वर्षांवरील प्रत्येक लाभार्थ्यांची मधुमेह, कर्करोग, हृदयरोग, रक्तदाब व पक्षाघात या आजारांची तपासणी व उपचार केले जातात.

या कार्यक्रमांतर्गत रत्नागिरीतही ऑगस्ट 2015 पासून कॅन्सर 

वॉरियर्स म्हणून ऑन्कोसर्जन डॉ. विक्रम घाणेकर यांच्याकडून प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या व चौथ्या सोमवारी कर्करोग्रस्त रुग्णांसाठी कर्करोग तज्ज्ञांकडून तपासणी, उपचार व  शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. यासाठी विक्रम घाणेकर चिपळूणहून रत्नागिरीत येतात. कोणत्याही प्रकारचे शुल्क ते आकारत नाहीत. समाजसेवा म्हणून ते हे काम करतात. त्याचप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सांघविकर व डॉ. काकडे तसेच डॉ. विटेकर व डॉ. पाटोदेकर यांचेही उपचार व शस्त्रक्रियेसाठी मोलाचे योगदान आहे. 

या कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयामध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पूर्णपणे मोफत केल्या जातात. खासगी रुग्णालयांमध्ये कॅन्सरच्या प्राथमिक स्थितीतील किमोथेरपीसाठी कमीत-कमी एक ते दीड लाख रुपये खर्च होतो. परंतु, या योजनेंतर्गत ती पूर्णपणे मोफत केली जाते. ज्या रुग्णांचे रेशन कार्ड केशरी रंगाचे आहे त्यांना हे सर्व उपचार पूर्णपणे मोफत दिले जातात. तर ज्या रुग्णाचे रेशन कार्ड सफेद रंगाचे त्यांना हे उपचार अगदी अल्प शुल्कात दिले जातात. तसेच  जिल्हा रुग्णालयाबाहेर शस्त्रक्रिया झालेले परंतु खासगी रुग्णालयात उपचार व किमोथेरपी घेऊ न शकणारे बरेचसे रुग्णही आता या कार्यक्रमांतर्गत उपचार घेत आहेत.