Sun, May 26, 2019 18:40होमपेज › Konkan › ‘मांडवी’ला लाटांचा तडाखा

‘मांडवी’ला लाटांचा तडाखा

Published On: Jul 15 2018 10:55PM | Last Updated: Jul 15 2018 10:35PMरत्नागिरी : प्रतिनिधी

‘गेट वे ऑफ रत्नागिरी’ असे म्हटले जाणार्‍या मांडवी जेटीला उधाणाच्या लाटांचा फटका बसला आहे. या जेटीच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून, जेटीवर नव्यानेच बसवण्यात आलेले पेव्हिंग ब्लॉक उचकटले आहेत. त्यामुळे सुमारे 3 कोटी खर्च करून होत असलेल्या नूतनीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप पर्यटकांतून करण्यात येत आहे.

रत्नागिरीमध्ये आलेल्या पर्यटकांचे संध्याकाळी फिरण्याचे आवडते ठिकाण म्हणजे मांडवी जेटी. ही जेटी ब्रिटिशकालीन आहे. मांडवी भागात अरबी समुद्रात थेट जाणारी ही 280 मीटर लांबीची व 4.20 मीटर रुंदीची बंदर जेटी 1934 मध्ये उभारण्यात आली होती. ब्रिटिश काळात तसेच स्वातंत्र्यानंतरही 1988 पर्यंत ही प्रवासी बंदर जेटी प्रवासी जलवाहतुकीसाठी कार्यरत होती. त्यानंतर मांडवी जेटीचा जलवाहतुकीसाठीचा वापर संपुष्टात आला व समुद्रकाठचे पर्यटनस्थळ म्हणून या जेटीकडे पाहिले जाऊ लागले. 

गेल्या 20 ते 25 वर्षांच्या काळात ही जेटी सागरी लाटांच्या तडाख्याने जागोजागी खचली आहे. अनेक ठिकाणी जेटीला तडे गेले आहेत. जेटीची आणखी दुरवस्था होऊ नये म्हणून राज्य सरकारच्या मेरिटाईम बोर्डकडून नूतनीकरण व दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. 

शुक्रवारच्या अमवास्येनंतर कोकण किनारपट्टीवर समुद्राला मोठी भरती आली होती. या भरतीमुळे आलेल्या समुद्राच्या उधाणाचा फटका मांडवी जेटीला बसला आहे. या जेटीला मोठमोठ्या लाटा येऊन धडकत आहेत. पाण्याच्या मारामुळे नूतनीकरण सुरू असलेल्या भागाला मोठा फटका बसला आहे. नव्यानेच बसवण्यात आलेले पेव्हर ब्लॉक लाटांमुळे समुद्रात वाहून गेले आहेत. नारळी पौर्णिमेपर्यंत अनेकवेळा उधाण येणार असून, यामुळे जेटीचे आणखी नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.