Wed, Mar 27, 2019 00:14होमपेज › Konkan › नोट खराब असल्याचे सांगत महिलेला हातोहात फसवले

नोट खराब असल्याचे सांगत महिलेला हातोहात फसवले

Published On: Sep 04 2018 11:38PM | Last Updated: Sep 04 2018 11:12PMरत्नागिरी : प्रतिनिधी

पैसे काढून झाल्यावर ते बँकेतच मोजत असताना अज्ञाताने त्यातील नोटा खराब असून त्या बदलून घ्या, असे सांगत महिलेचे 13 हजार 500 रुपये भर दिवसा हातोहात लांबवले. ही घटना मंगळवारी दुपारी 12 वा. सुमारास एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेत घडली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सईदा सादिक फणसोपकर (54, रा. कर्ला, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. मंगळवारी दुपारी बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी 12 वा. सुमारास त्यांनी आपल्या खात्यातून 40 हजार रुपयांची रक्कम काढली. त्यानंतर बँकेतच एका बाजूला जाऊन त्या पैसे मोजत होत्या.  तेवढ्यात एक अज्ञात तरुण तेथे आला. त्याने फणसोपकर यांना तुमच्या रकमेतील काही नोटा खराब असून त्या बदलून घ्या, असे सांगत त्यांच्या हातातील रक्कम आपल्या हातात घेत एक नोट त्यांना काढून दिली. नोटा खराब असल्याचे समजताच फणसोपकर यांचे लक्ष विचलित करुन त्याने एकूण रकमेतील सुमारे 13 हजार 500 रुपये हातसफाईने काढून घेतले.

यानंतर सईदा फणसोपकर यांनी पुन्हा पैसे मोजले असता त्यांना 40 हजार पैकी फक्त 26 हजार 500 रुपयेच आपल्याकडे असल्याचे आढळले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फणसोपकर यांनी तातडीने शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. याबाबत अधिक तपास पोलिस नाईक दीपक जाधव करत आहेत.