Tue, Jul 23, 2019 10:30होमपेज › Konkan › रत्नागिरीला पुन्हा अवकाळीचा इशारा

रत्नागिरीला पुन्हा अवकाळीचा इशारा

Published On: Feb 21 2018 1:20AM | Last Updated: Feb 20 2018 9:48PMरत्नागिरी : प्रतिनिधी

बदलत्या अनिश्‍चित वातावरणामुळे जिल्ह्यात  मळभी वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. अशातच मंगळवारी सकाळी जिल्ह्यात सर्वत्र धुक्याने व्यापलेल्या वातावरणात पावसाचा हलका शिडकावा झाला. दरम्यान, दिवसभर  वाढलेल्या तापमानाने  आंबा हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात बदललेल्या वातावरणाचे शुक्लकाष्ठ मात्र त्यामुळे कायम राहिले आहे. 

मध्यंतरी झालेल्या वातावरणातील बदलाने जिल्ह्यात अवकाळी सरी कोसळल्या होत्या. ऐन आंबा हंगामाच्या आरंभालाच  खोे घातल्याने आंबा मोहराला निर्माण  होणार्‍या संभाव्य  धोक्याने बागायदार धास्तावले होते. मात्र, गेले काही दिवस  पडलेल्या थंडीच्या दुलईने आंबा मोहराच्या संजीवनीला पोषक वातावरण निर्माण झाल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान होते. 

ढगाळ वातावरणामुळे नोव्हेंबरमध्ये थंडीचा कडाका कमी झाला होता. वातावरणातील या बदलाने  रत्नागिरी शहरासह  ग्रामीण भागात, चिपळूण आणि संगमेश्‍वर तालुक्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.  ऐन आंबा हंगामाच्या सुरुवातीलाच मळभी वातावरण जिल्हाभर कायम होते. अवकाळी पावसाने नुकताच फुटवा धरलेल्या पालवीवरील मोहर गळून पडण्याची भीती होती.  थंडीच्या आल्हादायक वातावरणावर पाणी फिरवून जिल्ह्यात विविध भागांत पावसाच्या सरी कमी अधिक प्रमाणात कोसळल्याने सुरवातीलाच खो बसण्याच्या शक्यतेने बागायतदार धास्तावले होते. 

दरम्यान, गेले तीन चार दिवस सकाळच्या वेळी दाट धुके पडत असून थंडीचा कडाकाही हळूहळू कमी होऊ लागला आहे. मंगळवारपासून आणखीन काही दिवस  असेच वातावरण राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.  त्यामुळे आता हातातोंडाशी आलेल्या आंबा हंगामात बदलत्या वातावरणाने पुन्हा बागायतदारांत भीतीचे वातावरण आहे. 
मंगळावरी जिल्ह्याच्या खोर्‍याचा भाग दाट धुक्याने व्यापलेला असतानाच प्रचंड आर्द्रता निर्माण होऊन मळभी वातावरणात पावसाच्या हलक्या सरी झाल्या. बदलत्या वातावरणाने बागायतदारांच्या फवारण्यांच्या वेळापत्रकातही बदल झाला आहे. कलमांवर आता फळाच्या देठात बळ असताना हलक्या पावसाने त्यावर डागांची स्थिती निर्माण होण्याची भीती आंबा बागायतदारांतून वर्तविण्यात येत आहे.