होमपेज › Konkan › जि.प.चे शिष्टमंडळ घेणार मंत्र्यांची भेट

जि.प.चे शिष्टमंडळ घेणार मंत्र्यांची भेट

Published On: Jul 15 2018 10:55PM | Last Updated: Jul 15 2018 9:20PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यात  वैद्यकीय अधिकार्‍यांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा आणि रस्त्यांना लागणारा निधी यासाठी अध्यक्षा स्वरुपा साळवी यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व मंत्र्यांची भेट शिष्टमंडळातर्फे घेण्याच्या निर्णय जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा स्वरुपा साळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच चहापानाच्या बैठकीत घेण्यात आला. 

या बैठकीला बांधकाम सभापती विनोद झगडे, सहदेव बेटकर, सौ. साधना साळवी, प्रकाश रसाळ, माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. जिल्ह्यात वैद्यकीय अधिकार्‍यांचा प्रश्‍न गंभीर आहे. कर्मचारी वर्ग अपुरा आहे. हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस क्लिनीक योजनेंतर्गत उपकेंद्रात बीएएमएस वैद्यकीय अधिकारी दिला जाणार आहे. ही योजना 17 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. त्यात बीएएमएसला 25 हजार मानधन आणि इतर भत्ते मिळतील. यामध्ये जिल्ह्याचा समावेश करावा, अशी मागणी आरोग्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या प्रादेशिक नळपाणी योजना तोट्यात आहेत. त्या फायद्यात आणण्यासाठी विचार करण्यात आला. ग्रामपंचायतींमार्फत मीटर बसवून आवश्यक पाण्याचा वापर केला जाईल. प्रत्येक सभापती आपापल्या खात्याचा आढावा घेण्यासाठी दर तीन महिन्यांनी तालुक्याच्या ठिकाणी जाईल. त्यात कामे कशी सुरु आहेत, त्यातील अडचणी यावर लक्ष केंद्रीत करता येणार आहे. भविष्यात होणार्‍या विषय समित्यांच्या सभांमध्ये अजेंड्या व्यतिरिक्त अन्य विषयावर चर्चा होणार नाही. प्रत्येक समितीचा अजेंडा नियमानुसार बनविण्यात येईल. त्यानुसारच बैठक चालविली जाईल.