Mon, May 27, 2019 06:45होमपेज › Konkan › ‘जलस्वराज्य’ची जागतिक बँकेकडून पाहणी

‘जलस्वराज्य’ची जागतिक बँकेकडून पाहणी

Published On: Mar 14 2018 10:29PM | Last Updated: Mar 14 2018 10:12PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यातील जलस्वराज्य-2 कार्यक्रमांतर्गत समाविष्ट असलेल्या घटकामधील निमशहरी गावे व टंचाईग्रस्त वाड्या यांची आढावा सभा जागतिक बँकेच्या सदस्यांच्या उपस्थितीत जि. प. तील छत्रपती शिवाजी सभागृह येथे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेनंतर जागतिक बँकेच्या सदस्यांनी प्रत्यक्ष कामांची पाहणी केली.

या आढावा सभेला जागतिक बँकेच्या श्रीमती लुसी टेरन, शिवांगी पांडे, मूर्ती, सत्यनारायण तसेच सुधारणा सहाय्य व प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. दिलीप देशमुख, वरिष्ठ जल-भू वैज्ञानिक राहुल ब्राह्मणकर, अभियांत्रिकी तज्ज्ञ अजय राऊत, समाज व्यवस्थापन तज्ज्ञ मंगेश भालेराव उपस्थित होते.

जलस्वराज्य-2 कार्यक्रम हा 12 जिल्ह्यात राबविला जात असून रत्नागिरी जिल्ह्यात 6 ग्रामपंचायती या निमशहरी तर 8 ग्रामपंचायतीमधील 14 वाड्या टंचाईग्रस्त घटकांतर्गत समाविष्ठ करण्यात आलेल्या आहेत. यावेळी जागतिक बँकेच्या सदस्यांनी सरपंच, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, सचिव, महिला विकास समिती अध्यक्ष, लेखापरीक्षण समितीचे अध्यक्ष व ग्रामसेवक यांच्यांशी संवाद साधला. आढावा सभा झाल्यावर संगमेश्‍वर तालुक्यातील मौजे असुर्डेमधील साखळकोंड येथे उभारण्यात आलेल्या मेटॅलिक झिंक टाकीची (साठवण टाकी) प्रत्यक्षात पाहणी जागतिक बँकेच्या सदस्यांनी केली.