Thu, Apr 25, 2019 06:00होमपेज › Konkan › हवामान विभागाच्या ‘मुसळधार’ अंदाजाकडे पावसाने फिरवली पाठ

हवामान विभागाच्या ‘मुसळधार’ अंदाजाकडे पावसाने फिरवली पाठ

Published On: Jul 20 2018 11:24PM | Last Updated: Jul 20 2018 11:02PMरत्नागिरी : प्रतिनिधी

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुसळधार  पावसाची शक्यता वर्तविली असताना जिल्ह्यात पावसाने गेले दोन दिवस पाठ फिरविली आहे. काही तुरळक सरींचा अपवाद वगळता शुक्रवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली. शुक्रवारी जिल्ह्यात केवळ 37 मि. मी. पाऊस झाला.  

आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 2346 मि. मी. पावसाची नोंद झाली. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात केवळ  1718 मि. मी. पाऊस झाला होता.  गतवर्षाच्या तुलनेत पाऊस यावर्षी सक्रिय असला तरी गेले तीन दिवस भारतीय हवमान खात्याकडून 22 जुलैपर्यंत दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र, गेले दोन दिवस पावसाचा जोर कमी झाला आहे. शुक्रवारी  सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या 24  तासांत जिल्ह्यात सरासरी 37 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. याणध्ये मंडणगड 37, दापोली 42, खेड 22, गुहागर 20, चिपळूण 30, संगमेश्‍वर65, रत्नागिरी27, लांजा 55 आणि राजापूर तालुक्यात 35 मिलीमीटर पाऊस झाल.

 दरम्यान, पावसाने जोर कमी केला असला तरी जिल्ह्यात नुकसानीच्या घटनांमध्ये सातत्य आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजता प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार खेड तालुक्यात कुळशी, मांडवे  आस्तान येथ घर आणि गोठ्याच्या  पडझडीत सुमारे सव्वा लाखांची हानी झाली. संगमेश्‍वर तालुक्यात  ताम्हाणे येथे  एका गोठ्याच्या पडझडीत  25 हजार रुपयांचे नुकसान झाले. चिपळूण तालुक्यात काडवली-धामणंद रस्त्यावरील मोरीचा हेडवॉल 
पावसामुळे कोसळल्याने रस्त्याचे 3 लाखांचे नुकसान झाल्याचे नियंत्रण कक्षातून कळविण्यात आले.