Thu, May 23, 2019 14:23
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › शस्त्रधारकांना मिळणार युनिक क्रमांक

शस्त्रधारकांना मिळणार युनिक क्रमांक

Published On: May 18 2018 1:17AM | Last Updated: May 17 2018 9:20PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यात 5 हजार 468 शस्त्र परवानाधारक असून या शस्त्रधारकांची ऑनलाईन माहिती भरण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. नोंदणीनंतर शस्त्रधारकांना युनिक क्रमांक देण्यात येणार आहे.
स्वसंरक्षणासाठी परवाना घेतलेल्या परवानाधारकांची संख्या 1 हजार 787 असून यापैकी केवळ 1 हजार 408 जणांनीच ऑनलाईन नोंदणी केली असून ऑनलाईन नोंदणी न केलेल्या 379 जणांचा परवाना रद्दचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाची ओळख निश्चित करण्यासाठी आधार नोंदणी सक्तीची झाली आहे. त्यावरूनच विविध सरकारी योजनांचे लाभ दिले जात असून त्यात मोठी पारदर्शकता आली आहे. बनावट नावावरून योजनांचे लाभ देणे बंद करण्यात आले आहे. याच धर्तीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात येणार्‍या शस्त्र परवान्याला युनिक आयडेंटीफिकेशन नंबर (युआयएन) देण्यात येणार आहे.

यासाठी केंद्र शासनाने शस्त्र परवाना कायद्यात तरतूद केली असून यामुळे बनावट शस्त्र परवान्यांना आळा बसणार आहे. केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार शस्त्र अधिनियम 1959 व शस्त्र नियम 1962 नुसार सर्व शस्त्र परवान्यांची माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात संकलित केली जाणार आहे. केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व पोलिस निरीक्षकांना शस्त्र परवानाधारकांच्या माहितीचा नमुना पुरवण्यात आलेला आहे. शस्त्रधारकांकडून हा नमुना अर्ज भरून घेण्यात आल्यानंतर माहितीची ऑनलाईन नोंद करून परवानाधारक शस्त्रधारकांना युनिक क्रमांक देण्यात येणार आहे. या युनिक क्रमांकावरून भविष्यात परवानाधारक शस्त्रासंबंधीची माहिती एका क्लिकवर त्वरित उपलब्ध होणार आहे. यामुळे एका परवान्यावर अनेक शस्त्रे बाळगणार्‍यांना चाप बसणार आहे.

अनेकांनी एका शस्त्र परवान्यावर एकापेक्षा अधिक शस्त्रे बाळगल्याची शक्यता आहे. परवान्यांच्या ऑनलाईन नोंदीमुळे अशा शस्त्रधारकांवर अंकुश ठेवण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात 5 हजार 468 शस्त्र परवानाधारक आहेत. यापैकी स्वरक्षणासाठी शस्त्र वापरणार्‍यांची संख्या 1 हजार 787 च्या घरात आहे. यापैकी 1 हजार 408 जणांनी आपली माहिती ऑनलाईन पद्धतीने भरली आहे. तर 379 जणांनी अद्यापही आपली माहिती ऑनलाईन भरलेली नाही. वारंवार सूचना देऊनही ऑनलाईन अर्ज न भरल्याने 379 जणांचे परवाने रद्दचा प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. शस्त्रधारकांचा शोध घेताना पोलिस विभागाची पुरती दमछाक उडाली आहे. अनेकजण जिल्ह्याबाहेर असल्याने नोंदणीत अडचण येत आहे.