Mon, Nov 19, 2018 16:55



होमपेज › Konkan › अघोषित संपात सहभागाबद्दल कर्मचार्‍यांच्या बदल्या रोखणार

अघोषित संपात सहभागाबद्दल कर्मचार्‍यांच्या बदल्या रोखणार

Published On: Aug 29 2018 1:29AM | Last Updated: Aug 28 2018 11:24PM



रत्नागिरी : प्रतिनिधी

अघोषित संपात सहभागी झाल्याने एसटीतील तीन वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या चालक, वाहकांवर कारवाई म्हणून त्यांच्या बदल्या रोखण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे 950 कर्मचार्‍यांनी बदल्यांसाठी अर्ज केले आहेत. यामध्ये 600 चालक, 350 वाहकांनी बदलीसाठी विनंती अर्ज केले आहेत. महामंडळाने घेतलेल्या नव्या निर्णयाचा फटका या कर्मचार्‍यांना बसणार आहे.  

 वेतन वाढीच्या मागणीसाठी दि. 8 व 9 जुलै रोजी एसटी कर्मचार्‍यांनी अघोषित संप पुकारला होता. या संपामुळे प्रवाशांचे हाल झाले होते. तसेच एसटी महामंडळ आगाराचेही करोडो रुपयांचे उत्पन्न बुडाले होते. अखेरच्या टप्प्यात संप मागे घेताना कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल न करण्याची अट संघटनेने घातली होती. ती अट सरकारने मान्य केली. तोडफोड व्यतिरिक्त अन्य गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतुु, कर्मचार्‍यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. 

संपाला जबाबदार असलेल्या कर्मचार्‍यांवर महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तीन वर्षे पूर्ण झालेल्या चालक, वाहकांना बदलीसाठी विनंती अर्ज करता येतो. कर्मचार्‍यांची विनंती तपासून आवश्यकतेनुसार वरिष्ठ कार्यालयाकडून बदलीचे आदेश देण्यात येतात. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 950 वाहक, चालकांनी बदल्यांसाठी अर्ज केले आहेत. 

यामध्ये 600 चालक, 350 वाहकांनी बदलीसाठी विनंती अर्ज केले आहेत. महामंडळाने घेतलेल्या नव्या निर्णयाचा फटका या कर्मचार्‍यांना बसणार आहे. महामंडळाने नव्याने काढलेला अध्यादेश रद्द होईपर्यंत बदली प्रक्रिया रोखण्यात आल्याने कर्मचारी पुन्हा अडचणीत येणार आहेत.एसटी महामंडळाच्या नव्या आदेशानंतर कर्मचारी संघटना कोणती भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशा मागणीचे निवेदन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना देण्यात आले आहे.