Sat, Jul 20, 2019 08:38होमपेज › Konkan › कोकणातील लघुपाटबंधारे प्रकल्पांसाठी वाढीव तरतूद

कोकणातील लघुपाटबंधारे प्रकल्पांसाठी वाढीव तरतूद

Published On: Jul 18 2018 10:41PM | Last Updated: Jul 18 2018 10:25PMरत्नागिरी : प्रितिनिधी

सरासरी साडेतीन हजार मि. मी. पाऊस पडणार्‍या कोकणातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी शासनाकडून देण्यात येणार्‍या निधीत वाढ करण्यात आली आहे. 2013 च्या जुन्या दरसूचीत बदल करताना वाढीव 90 टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे, रत्नागिरी, रायगड पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील 33 लघुपाटबंधारे प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. 

हे 33  प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे ठरल्याने रखडले होते. कोकणाची सिंचन क्षमता वाढविताना दरसूचीतील बदलाने आता हे प्रकल्प  मार्गी लागण्यातील अडथळा दूर झाला आहे.  लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी पाच वर्षांपूर्वी  प्रस्तावित करण्यात आलेले प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे प्रकल्प ठरले होते. त्यामुळे हे प्रकल्प डीडीएस (अडचणीचे धरणस्थळे) मध्ये टाकण्यात आले हाते. या प्रकल्पांना 2013 मध्ये त्यांचा आराखड्यानुसार निधीला मान्यता देण्यात आली होती. हे प्रकल्प राबविताना या प्रकल्पांना साहित्याच्या वाढीव दरात निधीला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार कोकणातील 33 प्रकल्पांना वाढीव निधीद्वारे मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये पालघरमध्ये 5, ठाणे  3, रायगड 12, रत्नागिरी 6, आणि सिंधुदुर्गातील 7 अशा  33 प्रकल्पांना वाढीव निधीच्या तरतुदीद्वारे 90 टक्के निधीला मान्यता देण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी चालू आर्थिक वर्षात करण्यात येणार असल्याने या प्रकल्पाद्वारे कोकणातील सिंचन क्षमता वाढणार आहे.