Mon, May 20, 2019 10:08होमपेज › Konkan › जिल्ह्यातील ६ प्लास्टिक उत्पादकांना ‘कारणे दाखवा’

जिल्ह्यातील ६ प्लास्टिक उत्पादकांना ‘कारणे दाखवा’

Published On: Jul 19 2018 10:31PM | Last Updated: Jul 19 2018 9:57PMरत्नागिरी : प्रतिनिधी

पर्यावरणासह जीवसृष्टीला हानीकारक ठरणार्‍या प्लास्टिकच्या वापरावर राज्य शासनाने निर्बंध आणल्यानंतर प्लास्टिक उत्पादन करणार्‍या उद्योगांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने करडी नजर ठेवली आहे. आतापर्यंत सिंधुदुर्गातील 6 सह कोकणातील 17 कारखान्यांना ‘कारणे दाखवा’ बजावण्यात आली आहे, अशी माहिती य्ेथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूत्रांनी दिली. 

अनिर्बंध वापरामुळे प्लास्टिक अणि तत्सम उत्पादने पर्यावरणासह जीवसृष्टीला घातक ठरत आहे. त्यामुळे वापर करण्यावर याआधी निर्बंध आणण्यात आले होते. मात्र, तरीही उत्पादन सुरूच राहिल्याने आता सरसकट प्लास्टिक बंदी शासनाने जाहीर केली. या बंदीमुळे प्लास्टिक उत्पादन करणारे  उद्योग अडचणीत आले आहेत. बंदीच्या पार्श्‍वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने उद्योगांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये आतापर्यंत रत्नागिरी 11, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 6 अशा एकूण 17 कारखान्यांना प्रस्तावित आदेशाद्वारे कारणे दाखवा बजावण्यात आली आहे. 

शासनाने अलिकडेच राज्यात प्लास्टिक व थर्मोकोल बंदी जाहीर केली. थर्मोकोल तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार्‍या दुकानदारांबरोबरच नागरिकांकडूनही पहिल्यावेळी नियमभंग केल्यास 5 हजार रूपयांचा दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर या दंडाच्या रकमेत 10 हजार रूपये व 25 हजार रुपये अशी वाढ होणार आहे. प्रसंगी गुन्हा दाखल करण्याची तरतूदही यामध्ये आहे.या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्पादन करणार्‍या उद्योगांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तपासणी करण्यात येत आहे. 

 यांना बजावल्या नोटिसा

सिंधुदुर्गातील कुडाळ येथील श्री ऍक्वा प्युरीफायर प्रा. लि., कणकवली येथील भद्रकाली मिनरल वॉटर इंडस्ट्रीज, जाधव बेव्हरेज प्रा. लि., इपिक्युअर फुडस् ऍण्ड बेव्हरेज, वैभववाडी येथील श्री स्वामी समर्थ फुडस् यांनाही नोटीस देण्यात आल्या आहेत.