Tue, Jul 23, 2019 02:21होमपेज › Konkan › बायकोच्या छळापासून वाचवा!

बायकोच्या छळापासून वाचवा!

Published On: Jul 15 2018 1:29AM | Last Updated: Jul 14 2018 10:56PMरत्नागिरी : अनिकेत पावसकर

एकविसाव्या शतकात फक्त पत्नीचाच पतीकडून छळ होतो, असे काही नाही. तर पत्नीकडूनही पतीराजांचा जाच होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रत्नागिरी जिल्हाही याला अपवाद नाही. 2013 सालापासून जून 2018 पर्यंत महिला समुपदेशन केंद्राकडे 597 केसेस दाखल करण्यात आल्या. त्यातील 119 केसेस या पत्नीने केलेल्या छळाविरोधातील आहेत. या आकडेवारीनुसार गतवर्षीपासून यात वाढ होत असल्याचे पुढे आले आहे.

भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे. आजही अमेरिकासारखे बहुतांश परकीय देश भारताच्या संस्कृतीला सलाम करतात. भारतासारखी आपल्याकडेही कुटुंब पद्धत असावी, यासाठी हे देश आग्रही आहेत. त्यांची जीवनपद्धती अशी आहे की, परदेशातील बहुतेक कुटुंब पद्धत रसातळाला गेली आहे. यामुळे समाजात अराजकता पसरत आहे.  त्यामुळे कुटुंब पद्धतीची वाताहात झाली आहे. परदेशात असे वातावरण असताना त्याची झळ आता भारतालाही बसू लागल्याचे अनेक उदाहरणांतून समोर आले आहे. हा धोका एवढ्या झपाट्याने वाढत आहे की, भारतही येत्या काही वर्षांत कुटुंब पद्धतीला मुकलेल्या देशांच्या पंगतीमध्ये जाऊन बसणार आहे.हे वाचून अन् ऐकून सर्वांना धक्का बसणार आहे. मात्र, वस्तुस्थिती अशीच काहीशी आहे. 

जिल्ह्यात आता पत्नीकडून पतींचा छळ होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. कायद्यामध्ये आजही महिलांना झुकते माप आहे. आजवर आपण जसे महिलेचा छळ झाला हे ऐकत आलोय तसेच आता महिलेकडून पुरुषाचा छळ होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. लग्नानंतर छोट्या-छोट्या गोष्टींवरुन होणारे वाद कमालीचे टोकाला व विकोपाला जात असल्याने त्यातून या घटना घडत आहेत. 

महिला समुपदेशन केंद्रामध्ये प्रथम तक्रार ऐकून घेतली जाते. एक बाजू ऐकल्यानंतर त्याची नोंद करुन दुसरी बाजू ऐकून दोघांमधील नेमक्या अडचणींचा आढावा घेऊन त्यांना त्याठिकाणी बोलावून संबंधित अडचणींचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थात त्याठिकाणी सामंजस्याची भावनाही गरजेची असते. धक्कादायक बाब म्हणजे अनेकदा किरकोळ कारणातून वाद वाढत गेल्याचे व कोणी कमी बाजू घ्यायची यातून प्रकरण घटस्फोटापर्यंत जात असल्याचेही समोर आले आहे. कुटुंब या संकल्पनेत महिलेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता मात्र पुरुषांचाही छळ होऊ लागल्याने कुटुंब व्यवस्था धोक्यात आली आहे.