Thu, Jul 18, 2019 16:30होमपेज › Konkan › कोकणला विनाशाकडे नेणार्‍यांना गाडणार : राऊत

कोकणला विनाशाकडे नेणार्‍यांना गाडणार : राऊत

Published On: Sep 01 2018 1:46AM | Last Updated: Aug 31 2018 11:34PMरत्नागिरी : प्रतिनिधी

कोकण ही देवभूमी असून तिला विनाशाकडे नेण्यापूर्वीच ‘अराम्को’ कंपनीचे विसर्जन झाले असून, आता कंपनीच्या दलालांना गाडायचे आहे, असा इशारा शिवसेना सचिव खा. विनायक राऊत यांनी दिला. पितृपक्षात मुख्यमंत्र्यांना प्रकल्पाच्या श्राद्धाला बोलवणार असल्याचे सांगत खा. राऊत यांनी रिफायनरीविरोधात शिवसेना प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी शेवटपर्यंत राहणार असल्याचे सांगितले. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून साळवी स्टॉप ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या लाँग मार्चला शिवसेना पदाधिकार्‍यांसह हजारोंच्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील शिवसेना शाखेतील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून दुपारी पावणेबाराच्या सुमारास खा. विनायक राऊत, आ. राजन साळवी,  आ. उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके  यांच्या नेतृत्वाखाली लाँग मार्चला सुरुवात झाली. यावेळी रिफायनरीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लाँग मार्चमध्ये सहभागी झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या  हातामध्ये शासन विरोधी फलक झळकत होते.

साळवी स्टॉप, शिवाजीनगर, मारुती मंदिर, माळनाका, सिव्हिल हॉस्पिटलमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. याठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या भूमिकेवरुन सर्वांनीच त्यांच्यावर घोषणांमधून टीकेचे आसूड ओढले.

यावेळी खा. राऊत म्हणाले की, भाजपचे मंत्री व स्थानिक भडगुंजे लोक या प्रकल्पाचे समर्थन करीत आहेत. प्रकल्पग्रस्तांची घरे, शेती, मत्स्य व्यवसायाबरोबरच श्रद्धास्थाने उद्ध्वस्त होणार आहेत.  जागा, जमिनी विकत घेण्यासाठी दलालांचे साम्राज्य उभे राहिले आहे. केंद्र व राज्य शासन यासाठी प्रयत्नशील असून एकमुखाने याला विरोध होत आहे. आता लाँग मार्च झाला, यापुढे पितृपक्षात प्रकल्पाचे श्राद्ध करायचे असून त्यासाठी मुख्यमंत्र्यांना बोलवणार असल्याचे ते म्हणाले. देवदेवतांच्या कृपेने अणुऊर्जेची ‘अरेवा’ गेली आता रिफायनरीची ‘अराम्को’ही बुडीत निघणार आहे. सरकारचे मंत्री या प्रकल्पात दुकानदारी करीत असल्याचा आरोपही खा. राऊत यांनी केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांचीही फिरकी घेत त्यांनी टीका केली. मलबार हिलवर दलालीसाठी काहींनी फ्लॅटही घेतले असल्याचे खा. राऊत म्हणाले. कोकणच्या या देवभूमीत आडवे येणार्‍यांचा नि:पात झाल्याशिवाय  राहणार नाही, असे सांगतानाच अणुऊर्जेच्या जागेवर सौरऊर्जा प्रकल्प व कागद कारखाना आणावा, अशी मागणीही त्यांनी केली.

शेतकरी-मच्छीमार कृती समिती अध्यक्ष नजीब भाटकर, सेना संपर्कप्रमुख संजय मोरे, आ. राजन साळवी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्त, विद्यार्थी, मच्छीमार, शेतकरी महिला, शिवसेना पदाधिकार्‍यांनी निवेदन दिले व शासनापर्यंत पोचविण्याची मागणी केली. या लाँग मार्चमध्ये शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व युवासेना, महिला संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.