होमपेज › Konkan › रिफायनरी विरोधासाठी व्यूहरचना

रिफायनरी विरोधासाठी व्यूहरचना

Published On: May 18 2018 1:17AM | Last Updated: May 17 2018 9:37PMरत्नागिरी : शहर वार्ताहर

तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पा विरोधाची धार अधिक तीव्र करण्यासाठी आता प्रकल्प बाधित क्षेत्राबाहेरील गावांमध्येही जनजागृती करण्यास सुरूवात झाली आहे. प्रत्येकी 25 जणांची 22 पथके निर्माण करण्यात आली असून या पथकांमार्फत गावात जनजागृती सुरू करण्यात आली आहे. यातून प्रकल्प विरोधाची व्यूहरचना आखण्यात आली आहे.

राजापूर तालुक्यातील नाणारसह परिसरातील गावांमध्ये रिफायनरी प्रकल्प होऊ घातला असून या प्रकल्पाला सुरूवातीपासूनच येथील स्थानिक जनतेचा विरोध होत आलेला आहे. मात्र शासन हा प्रकल्प रेटून नेण्याचे काम करत असून प्रकल्प विरोधात अनेकवेळा आवाज उठवूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या प्रकल्पासाठी सरकारने सौदी अरेबीयाच्या अरामको कंपनीशी सामंज्यस्य करार केल्यानंतर आणखी एका कंपनीबरोबरही करार केल्याने शासनाचे प्रकल्प रेटण्याचे इरादे स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे प्रकल्प विरोधाची व्याप्ती वाढविण्यासाठी अन्य गावांमध्ये कोकण विनाशकारी रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांच्या नेतृत्वखाली प्रबोधन करण्यास प्रारंभ केला आहे.

काही दिवसापासूनच सुरू झालेल्या या मोहिमेला ग्रामस्थांमधून चांगला प्रतिसाद मिळत असून यापुढे होणार्‍या रिफायनरी विरोधातील आंदोलनामध्ये आमचा मोठया संख्येने सहभाग असेल असा विश्वास प्रकल्प विरोधी समितीच्या शिष्टमंडळांना देण्यात येत आहे. यासाठी प्रत्येकी 25 जणाची 22 पथके नेमण्यात आली असून या पथकांच्या माध्यमातून प्रकल्प विरोधाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.
दरम्यान शासन प्रकल्प रेटून नेण्यासाठी आग्रही असताना सागवे येथील भूमीकन्या एकता मंचाच्या वतीने नाणार परीसरात होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात 30 मे रोजी सकाळी 10.30 वाजता धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पाला नाणार परीसरासह राजापूर तालुका व देवगड तालुक्यातूनही जोरदार विरोध दर्शविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे कोकणची राखरांगोळी होणार असून हा प्रकल्प कोकणातून हद्दपार झालाच पाहीजे अशी भूमिका मंचाने घेतली आहे. कोकणात लादलेला हा प्रकल्प परतविण्यासाठी या मोर्चामध्ये संपुर्ण कोकणातील जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन भूमिकन्या एकता मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.