Tue, May 21, 2019 18:21होमपेज › Konkan › जिल्ह्यात गत ५ वर्षांच्या तुलनेत विक्रमी पाऊस

जिल्ह्यात गत ५ वर्षांच्या तुलनेत विक्रमी पाऊस

Published On: Jul 18 2018 10:41PM | Last Updated: Jul 18 2018 10:16PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जुलैच्या पहिल्या पंधरवड्यानंतर जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात  2284 मि. मी.च्या सरासरीने 21 हजार मि. मी. पाऊस झाला. गेल्या पाच वर्षातील हा विक्रम पावसाने मोडला असून गतवर्षी जिल्ह्यात केवळ 1344 मि. मी.च्या सरासरीने 13 हजार मि. मी. पाऊस झाला होता. पावसाने जुलै महिन्यात सातत्य ठेवले असून बुधवारी  जिल्ह्यात 50 मि. मी.च्या सरासरीने 500 मि. मी. पाऊस झाला. बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात साडेपाच लाखांची हानी झाली.

बुधवारी  सकाळी 10 वाजता प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार खेड येथे एका गोठ्याचे साडेबारा हजार रुपयांचे नुकसान झाले. सारव येथे एका घराचे 30 हजारांची हानी झाली. वडगाव येथे घराच्या पडझडीत सुमारे 25 हजारांचे नुकसान झाले. तर सुकदर येथे एका घराची 64 हजारांची हानी झाली. चोरवणे गावात मुसळधार पावसाने दोन घरांची सुमारे दोन लाखांची हानी झाली. चिपळूण तालुक्यात येथे एका गोठ्याचे पावसामुळे  5 हजार  रुपयांचे अंशत: नुकसान  झाले. चिपळूण येथे घराचे  पावसामुळे 2 हजार 500 रुपयांचे अंशत: नुकसान झाले आहे.

गुहागर तालुक्यात साखरी येथे एका घराचे पावसामुळे 90 हजार रुपयांचे नुकसान झाले. संगमेश्‍वर तालुक्यात बेलारेवाडी येथे घराचे पावसामुळे 12 हजार 200 रुपयांचे अंशत: नुकसान झाले. नवेलीवाडी येथे घराचे पावसामुळे  82 हजार 535 रुपयांचे अंशत: नुकसान झाले आहे. राजापूर तालुक्यात साखर मिरगुलेवाडी येथ घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले.

बुध़वारी 24 तासांत जिल्ह्यात  सरासरी 50.89 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये  मंडणगड 42, दापोली 62, खेड 81, गुहागर17, चिपळूण 56, संगमेश्‍वर 42, रत्नागिरी 15, लांजा 68  आणि राजापूर तालुक्यात 75 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, जिल्ह्यात पावसाने विक्रमी वाटचाल सुरू केली आहे.  जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यानंतर सर्वाधिक पावसाची नोंद राजापूर तालुक्यात झाली आहे. तर सर्वात कमी पर्जन्यमान दापोली तालुक्यात झाले आहे.