Tue, Apr 23, 2019 02:03होमपेज › Konkan › रत्नागिरी किनारपट्टीला उधाणाचा तडाखा

रत्नागिरी किनारपट्टीला उधाणाचा तडाखा

Published On: Jul 15 2018 1:29AM | Last Updated: Jul 14 2018 11:03PMरत्नागिरी : प्रतिनिधी

अमावस्येच्या दुसर्‍याच दिवशी आलेल्या उधाणाचा फटका रत्नागिरीतील अनेक किनारपट्टी भागांना बसला. मोठ्या लाटांनी किनारपट्टीचा भाग अक्षरक्षः धुवून काढला. काही ठिकाणच्या धूपप्रतिबंधक बंधार्‍यांना भगदाड पडले. नजीकच्या भाट्ये किनारी अनेक ठिकाणी वाळूची मोठ्या प्रमाणात धूप झाली असून, सुरूची झाडे उन्मळून पडली आहेत. येथील टेहळणी मनोरा कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहे. 

शुक्रवारच्या अमावस्येनंतर शनिवारी भरतीच्या वेळी समुद्राच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली होती. खवळलेल्या समुद्रात सुमारे तीन ते चार मीटर उंचीपर्यंत लाटा उसळत होत्या. त्याचा जोरदार तडाखा येथील किनारपट्टीवरील भागाला बसला. 

शनिवारी सकाळी लाटांच्या जोरामुळे भाट्ये किनार्‍यावरील वाळूची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. अनेक ठिकाणी भगदाड पडल्याने लाटा सुरूच्या बनापर्यंत धडकत होत्या. यात सुरूची झाडेही उन्मळून पडली. समुद्राच्या पाण्यातून वाहून आलेला कचराही किनारट्टीवर साचला आहे. दुपारनंतर पाण्याची पातळी थोडी ओसरली. मात्र, तोपर्यंत किनार्‍याचे बरेच नुकसान झाले आहे. कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून पर्यटक आणि नागरिकांसाठी हा किनारा बंद करण्यात आला आहे. तसेच येथे पोलिस आणि होमगार्ड कर्मचार्‍यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, कोणीही किनारपट्ठीनजिक जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या लाटांचा तडाखा मांडवी आणि मिर्‍या किनारपट्टीलाही बसला. मांडवी येथे घरातील अंगणात समुद्राचे पाणी आले होते. पंधरामाड येथील धूपप्रतिबंधक बंधार्‍याला दोन ठिकाणी भगदाड पडले असून, येथील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. काही ठिकाणी बंधार्‍यावरून पाणी नारळाच्या बागेत शिरत असून, जवळच असणार्‍या घरांनाही धोका निर्माण झाला आहे. यापुढील दोन दिवस परिस्थिती अशीच राहणार असल्याने येथील नागरिक जीव मुठीत धरून बसले आहे.