होमपेज › Konkan › किनारी गावांना ऑनलाईन आपत्ती निवारण प्रशिक्षण

किनारी गावांना ऑनलाईन आपत्ती निवारण प्रशिक्षण

Published On: Jun 22 2018 10:36PM | Last Updated: Jun 22 2018 10:30PMरत्नागिरी : प्रतिनिधी

अलीकडेच घडलेल्या आरेवारे येथील दुर्घटनेसारखे प्रकार टाळण्यासाठी  आणि  आपत्तीग्रस्त पर्यटकांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्यासाठी किनारी गावांसह पावसाळी पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या गावांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण ऑनलाईन देण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी दिली.

गणपतीपुळे आणि जिल्ह्यातील वर्दळीच्या किनार्‍यांवर अनेक दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. पावसाळा सुरू होण्यापूर्वी अलीकडेच आरेवारे येथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला होता. अशा दुर्घटना टाळण्यासाठी आता किनारी गावांसह पावासाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गावांना थेट ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये गावातील होतकरु तरुणांना  ग्राम सुरक्षा रक्षक म्हणून प्रशिक्षण  देण्यात येणार आहे. 

यासाठी आपत्ती निवारणासाठी ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या साहित्यांचा वापर, आपत्तीमध्ये राबविण्याची संपर्क यंत्रणा, आधुनिक तंत्राचा वापर आणि संपर्क यंत्रणा याबाबत प्रशिक्षित करण्यात येणार आहे. यासाठी खास प्रशिक्षकांकडून थेट मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीत  आपत्ती निवारणाचे थेट प्रशिक्षण वर्ग आयोजित करुन त्यांना एकाच वेळी प्रशिक्षित करण्यात येणार आहे. 

पावसाळ्यात जिल्ह्यातील अनेक गावांत पावसाळी पर्यटनासाठी  विशेषतः धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक येतात. या ठिकाणावर दुघर्र्र्टना घडू नये, यासाठी ग्रामसुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात येणार आहे. या ठिकाणी होणार्‍या दुघर्र्टनामध्ये करण्यात येणारे बचावकार्य, मदत आणि मार्गदर्शन याबाबत प्रशिक्षित करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील 37 गावांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील आरेवारे, वरवडे, गणपतीपुळे, भाट्ये, कुर्ली,  निवळी, उक्षी, पोमेंडी, नेवरे,  टिके आदी गावांची निवड करण्यात आली आहे.  गुहागर, राजापूर आणि दापोली या तालुक्यांतीलही वीस गावांची निवड या उपक्रमामध्ये करण्यात आली आहे. उर्वरित गावे ही जिल्ह्याच्या किनारी भागातील नाहीत. मात्र, जिथे पावसाळी पर्यटनाला वाव मिळतो, अशा भागातील ती ठिकाणे आहेत.