Sun, Nov 18, 2018 09:21होमपेज › Konkan › ...आता खाद्य बर्फ ओळखता येणार

...आता खाद्य बर्फ ओळखता येणार

Published On: May 13 2018 10:22PM | Last Updated: May 13 2018 9:26PMरत्नागिरी : प्रतिनिधी

औषध प्रशासनाने औद्योगिक बर्फ आणि खाद्य बर्फ वेगळा असावा, यासाठी बर्फाच्या उत्पादनासंदर्भातील अधिसूचना काढली होती. याबाबतचे निवेदन विधान सभेच्या दोन्ही सभागृहांत सादर करण्यात आले होते. या पॅटर्नला केंद्रानेही मंजुरी दिली असून, हा पॅटर्न देशातील सर्वच राज्यांना लागू केला आहे. 

बर्फामध्ये होणार्‍या भेसळीमुळे मानवी आरोग्यावर होणार्‍या दुष्परिणामांचा विचार करून, सर्वसामान्यांना खाद्य व अखाद्य बर्फ ओळखता यावा यासाठी उपाय योजना करण्याबद्दल अन्न व औषध प्रशासन मंत्री बापट यांनी आदेश दिले होते. याबाबत अभ्यास केल्यानंतर प्रशासनाने अखाद्य बर्फ ओळखण्यासाठी त्यात खाण्यास योग्य असा फिकट निळा रंग वापरण्यात यावा, असा प्रस्ताव तयार केला होता. खाद्य बर्फ मात्र पिण्यास योग्य पाणी वापरून पारदर्शक करण्यात यावा, असे या प्रस्तावात म्हटले आहे.

मासे, मटण अशा विविध पदार्थांच्या साठवणीसाठी अखाद्य बर्फ वापरला जातो. त्यामुळे हा रंग खाण्यात आला तरी त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत असा त्यापाठीमागे उद्देश आहे. राज्यात ही अधिसूचना लागू केल्यानंतर हा प्रस्ताव केंद्राकडेही पाठवण्यात आला होता. केंद्राच्या फूड सेख्रटी अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया या संस्थेने महाराष्ट्राचा हा प्रस्ताव स्वीकारला असून, देशातील इतर राज्यातही या नियमाचा अवलंब करण्याचे आदेश दिले आहेत. 

देशभरात 1 जून 2018 पासून याबाबतचा आदेश लागू होणार असून, या कायद्याचे उल्लंघन करणार्‍या  बर्फ उत्पादकांवर कारवाई करण्यात येणार आहे.