Sat, Jul 20, 2019 23:38होमपेज › Konkan › आता वीज बिल भरा फिरत्या केंद्रातून!

आता वीज बिल भरा फिरत्या केंद्रातून!

Published On: Jul 10 2018 10:47PM | Last Updated: Jul 10 2018 10:38PMरत्नागिरी : विशाल मोरे

आता मोठमोठ्या रांगेत थांबून वीज बिल भरावे लागणार नाही. यासाठी महावितरण कंपनीने ‘फिरते वीज बिल भरणा केंद्र’ सुरू केले आहे. आता सरळ तुम्ही राहता त्या ठिकाणी ‘महावितरण’ ची गाडी येऊन तुमचे बिल भरून घेणार आहे. हा उपक्रम सध्या लांजा आणि रत्नागिरीत प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला असून, चांगला प्रतिसाद मिळाल्यास कायम केला जाणार असल्याचे ‘महावितरण’च्या रत्नागिरी परिमंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता प्रभाकर पेठकर यांनी सांगितले.

विजेचे बिल स्वीकारण्यासोबतच ग्राहकांना माहिती देण्याची सुविधाही या वाहनात उपलब्ध आहे. वीज बिल भरणा केंद्र नसलेली गावे, दूरवस्ती आणि दुर्गम भागातील गावे तसेच दाट लोकवस्तींची गावे 
या उपक्रमात सहभागी केली जाणार आहेत. सध्या आपल्याकडे बँका, पतपेढ्या, मोबाईल अ‍ॅप आणि ऑनलाईन बिल भरण्याची सुविधा आहे. मात्र, ग्रामीण भागातील सोयीसुविधांचा अभाव लक्षात घेऊन सुरू केलेली ही सेवा ‘महावितरण’चं महसूल वाढवून देण्यास सहाय्यभूत ठरू शकते.

लांजा आणि रत्नागिरीत ही सुविधा दि. 25 जूनपासून सुरू करण्यात आली आहे. दि. 6 जुलैपर्यंत 175 जणांनी वीजबिल भरले असून सुमारे 2 लाखांचे संकलन झाले आहे. ग्रामीण भागात साप्ताहिक बाजाराच्या दिवशीही बाजारस्थळी हा उपक्रम राबवला जाणार आहे. बाजाराच्या दिवशी अनेक लोक बाजारात येतात. त्यांची सोय व्हावी म्हणून या पर्यायावर विचार केला जात आहे.