Fri, Jul 19, 2019 18:29होमपेज › Konkan › आंबा वाहतुकीची सेस वसुली अनधिकृतच

आंबा वाहतुकीची सेस वसुली अनधिकृतच

Published On: Jul 17 2018 11:00PM | Last Updated: Jul 17 2018 10:47PMरत्नागिरी : प्रतिनिधी

राज्य सरकारने फळे व भाजीपाला या वस्तू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमनातून मुक्त केल्या आहेत. असे असताना रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीने उभारलेल्या नाक्यांवरून आंबा वाहतूकदारांकडून सेस वसूल करण्यात आला असल्याचा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते नित्यानंद दळवी यांनी केला आहे.

मंगळवारी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत संकेत चवंडे, मेहताब साखरकर आदी उपस्थित होते. ते म्हणाले की,  कृषी उत्पन्न बाजार समितीने आंबा वाहतूकदारांकडून सेस वसूल केला आहे. रत्नागिरी ‘एमआयडीसी’मधील एक्झॉटिक फ्रूट कंपनीच्या आंबा वाहतूक करणार्‍या वाहनांवर सेस वसुली करण्यात आली आहे. आंबा हे फळ नियमनातून मुक्त केले असतानाही गेल्या एका महिन्यात सुमारे फक्त एक्झॉटिक फ्रूट कंपनीकडून सव्वा तीन लाख रुपयांचा सेस वसूल करण्यात आला आहे. याबाबत कारवाई करावी, असे निवेदन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आले आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समिती पणन संचालनालयाच्या अधिपत्याखाली येते. बाजार समित्यांना कोणत्याही ठिकाणी, वाहनांवर, तपासणी नाक्यावर राजमुद्रा तसेच महाराष्ट्र शासन छापणे किंवा लिहिण्यास मनाई आहे. असे असताना रत्नागिरी कृषी बाजार समितीच्या दोन वाहनांवर महाराष्ट्र शासन असे लिहिण्यात आले आहे. याबाबत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. 

मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली ते बावनदी या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, वाहनचालक व प्रवाशांचे हाल होत आहेत. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना अस्तित्वातील रस्त्याची दुरुस्ती व देखभालीचे काम या महामार्गाचे ठेकेदार यांनी करायचे आहे. मात्र, ठेकेदार मेप (चएझ) यांनी पावसापूर्वी एका सब कॉन्ट्रॅक्टरला ठेका दिला असता ठेकेदाराने तांत्रिक बाबींची पूर्तता न केल्याने हा ठेका रद्द करण्यात आला होता. यामुळे महामार्गाच्या ठेकेदाराने अन्य पोट ठेकेदार यांच्याकडून काम करून घेऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कॅव्हेटसुद्धा दाखल केले आहे. मात्र, अद्यापही खड्डे बुजवण्यात न आल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महामार्गावरील खड्डे त्वरीत बुजवावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.