Wed, Apr 24, 2019 21:31होमपेज › Konkan › आंबा पीक कर्ज व्याजाची रक्कम मिळणार : मुख्यमंत्री

आंबा पीक कर्ज व्याजाची रक्कम मिळणार : मुख्यमंत्री

Published On: Sep 07 2018 10:19PM | Last Updated: Sep 07 2018 10:19PMरत्नागिरी : प्रतिनिधी

कर्जावरील व्याजमाफी होऊनही गेल्या चार वर्षांत शासनाने त्याची पूर्तता केलेली नसल्याने बँकांकडून आंबा व्यापार्‍यांची लूट होत आहे. हा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी खा. नारायण राणे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आंबा व्यापार्‍यांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी शासनाने जाहीर केलेली व्याजमाफीची रक्कम आठ दिवसांत आंबा बागायतदारांच्या खात्यात जमा करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती पावस परिसर आंबा बागायतदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश साळवी व उपाध्यक्ष अक्रमशेठ नाखवा यांनी दिली.

आंबा बागायतदार गेल्या चार-पाच वर्षांपासून अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. यासंदर्भात माजी खा. नीलेश राणे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आंबा बागायतदारांनी समस्या ठेवल्या. त्यानंतर रत्नागिरी येथे आंबा बागायतदारांचे चर्चासत्र पार पडले. यावेळी खा. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांशी भेट घडविण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार खा. नारायण राणे, माजी खा. नीलेश राणे यांनी आंबा बागायतदारांची मुख्यमंत्र्यांसोबत गुरुवारी भेट घडवून आणली. यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर आंबा बागायतदारांनी आपल्या समस्या मांडल्या.

आंबा हे नाशवंत फळ असल्याने त्याला मिळणारा भाव उत्पादन खर्चाशी निगडीत असावा. सन2014-15 साली अवकाळी पावसामुळे आंब्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी शासनाने जाहीर केलेली तीन महिन्याची व्याजमाफी अद्याप झालेली नाही. त्यानंतर पुढील चार वर्षे सहा टक्के व्याज शासन भरणार होते. तेही आजपर्यंत जमा झालेले नाही. पीक विम्यातून कोट्यवधी रुपये विमा कंपन्यांना मिळाले. परंतु, शेतकर्‍यांना एका रुपयांचाही फायदा झाला नसल्याचे आंबा उत्पादकांनी सांगितले.  ओखी वादळाने नुकसान झालेल्या शेतकर्‍याच्या खात्यात नुकसात भरपाई जमा करावी. पुनर्गठन केलेल्या कर्जाचे एक वर्षाचे व्याज शासन देणार होते तेही अद्याप दिलेले नाही. आंबा विक्रीसाठी प्रत्येक शहरात जागा उपलब्ध करुन द्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ दिवसांत कर्जाच्या व्याजाचे पैसे जमा करण्याचे आदेश सचिवांना दिले.