Mon, Apr 22, 2019 12:42होमपेज › Konkan › जमीन व्यवहार कळीचा मुद्दा

जमीन व्यवहार कळीचा मुद्दा

Published On: May 25 2018 11:34PM | Last Updated: May 25 2018 10:32PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी 

नाणार रिफायनरीसंदर्भात सत्तेत असलेल्या सेना-भाजपमधील धुसफूस प्रकल्प व्हावा - न व्हावा यासाठी नाही. तेथील जमीन व्यवहार जे आता आटोपले आहेत हा खरा कळीचा मुद्दा असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. चौपदरीकरणाचे काम अपुरे असल्याने दरडी कोसळण्याची भीती असल्याचेही सांगितले. राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना नाणार प्रकल्प, मराठी शाळा, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण आदी विषयांवर परखड मते मांडली.

राजापुरातील नाणार प्रकल्पाबाबत ते म्हणाले की, अशा रिफायनरीसाठी कोकण नाही. त्या जमिनीचे जे पोटेन्शीअल आहे तेच वापरले गेले पाहिजे. अशी जमीन इतर कुठल्या देशात असते तर सोनं केले असते, पण आपल्याकडे राखरांगोळी केली जात आहे. विकासाला आपला विरोध नाही, पण हा प्रकल्प दुसरीकडे सरकवता येतो का? याचा अभ्यास झाला पाहिजे, पण आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, नको असेल तर प्रकल्प गुजरातला नेतो. मुख्यमंत्र्यांचे हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुश करण्यासाठी आहे. देशात दुसरे राज्य नाही का? असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

मनसे नेते राज ठाकरे शुक्रवारी सहकारी नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, संजय नाईक, सतीश नारकर यांच्यासोबत रत्नागिरी दौर्‍यावर आहेत. भाजप, शिवसेना सत्तेत आहेत. अशावेळी शिवसेनेचा विरोध आणि भाजप नाणार प्रकल्प रेटत नेतोय. ही लोकांची चक्क फसवणूक सुरू असल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला.
राज्यातील मराठी शाळा चालविणार्‍या संस्था चालकांनी आपल्या शाळांमध्ये पहिलीपासूनच्या वर्गांसाठी 2 तास इंग्रजीसाठी वाढवून घेतले पाहिजेत. शासकीय शाळांमध्येही अशीच पद्धत अवलंबली पाहिजे. त्याचवेळी तेथे मराठी संस्कृती, मराठी वातावरण निर्मिती केली पाहिजे. तर मराठी शाळांमध्ये प्रवेश वाढताना दिसतील, अन्यथा त्या शाळा बंदच्या मार्गावरच जाणार असेही ठाकरे यांनी सांगितले. त्याचबरोबर येथील शाळा व येणार्‍या उद्योगांमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावे, यासाठी आपण आग्रही असल्याचेही ते म्हणाले.

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या सुरू असलेल्या कामाबाबतही ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, काँग्रेसच्या काळापासून चौपदरीकरण कामाची कार्यवाही सुरू आहे. भाजपच्या काळात काम सुरू झाले आहे, पण ते काम अपुरे असल्याने नुकसान होणार आहे. दरडी कोसळण्याची भीती आहे. चीनमध्ये डोंगरातून रस्ते काढण्याचे काम सहजरित्या होते, तसे आधुनिक तंत्रज्ञान वापरून चौपदरीकरणाचे काम होऊ शकत नाही का? असा सवालही केला.

केरळचे लोक मोठ्या संख्येने परदेशात आहेत. ते आपल्या जमिनी प्रकल्पांसाठी देत नाहीत. पर्यटनाचे पोटेन्शीअल आहे तेच केले जाते, मग कोकणातच जमिनी का विकल्या जात आहेत? जमिनी गेल्या की कोकणचे वैभव संपलेच समजा, असे सांगून जमिनी न विकण्याचे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.