Thu, Jun 27, 2019 16:42होमपेज › Konkan › कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

Published On: May 25 2018 11:34PM | Last Updated: May 25 2018 10:24PM रत्नागिरी : प्रतिनिधी

निवडणूक आयोगाने मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व कोकण पदवीधर विधान परिषद मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक 2018चा कार्यक्रम जाहीर केला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निदेशाप्रमाणे नामनिदर्शेन अर्ज गुरुवार दि. 31 मे 2018 पासून गुरुवार दि.7 जून 2018 पर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, कोकण विभाग किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप आयुक्त (सामान्य प्रशासन) पहिला माळा, कोकण भवन, सी.बी.डी.बेलापूर, नवी मुंबई यांच्या दालनामध्ये स्विकारण्यात येणार आहेत 

प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी शुक्रवार दि.8 जून 2018 रोजी सकाळी 11 पासून करण्यात येईल. सोमवार दि.11 जून रोजी दुपारी 3  वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. सोमवार दि.25 जून 2018 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 पर्यंत मतदान घेण्यात येईल व गुरुवार दि.28 जून 2018 रोजी मतमोजणी घेण्यात येणार आहे. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघासाठी आदर्श आचारसंहिता गुरुवार दि.24 मे 2018 पासून अंमलात आलेली आहे. याबाबतीत सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलिस अधीक्षक व संबंधितांना कळविलेले आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

मुंबई शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ, कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त कोकण विभाग हे राहतील. तसेच उप आयुक्त (समान्य प्रशासन), कोकण विभाग, जिल्हाधिकारी मुंबई शहर व जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा हे या निवडणुकीकरीता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. तसेच कोकण विभाग पदवीधर मतदार संघाकरीता उप आयुक्त (सामान्य प्रशासन), जिल्हाधिकारी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील.
या  निवडणूकीचे वेळी सर्व मतदारांनी आपले मतदानाचा हक्क बजावावा असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे.